मतदानापासून वंचित राहू नये यासाठी जनजागृती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 01:03 AM2019-08-10T01:03:24+5:302019-08-10T01:03:43+5:30
आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीमध्ये कोणताही मतदार हा मतदानापासून वंचित राहू नये, याकरिता ग्रामस्तरावर व्यापक जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीमध्ये कोणताही मतदार हा मतदानापासून वंचित राहू नये, याकरिता ग्रामस्तरावर व्यापक जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ मध्ये स्विप कार्यक्रमाची जनजागृतीबाबत आढावा बैठक शुक्रवारी पार पडली.त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी निवडणूक प्रमोद भूसारी, उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे, उपविभागीय अधिकारी गजेंद्र बालपांडे, तहसीलदार अक्षय पोयाम आदींची उपस्थिती होती. आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी यांचे वतीने मतदान प्रक्रीयेची व्यापक जनजागृती करण्याबाबत कालबध्द कार्यक्रम तयार करण्यात आलेला आहे. या कालबध्द कार्यक्रमाचा आढावा घेवून मतदान प्रक्रीयेची जनजागृती ग्रामस्तरापासून तर जिल्हास्तरापर्यंत व्यापक प्रमाणात व्हावी , अशा सुचना या प्रसंगी भंडारा, साकोली, तुमसर या विधानसभा क्षेत्राचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी, तसेच तहसीलदार यांना केल्या.
स्विप कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी विविध पातळीवर उपक्रम राबविण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिले. यामध्ये गावपातळीवर शाळांमध्ये संकल्प पत्रांचे वाटप व गोळा करणे, वॉर्ड सभा घेवून जनजागृती करणे, तसेच मतदान केंद्रावर मतदान यादीचे वाचन करणे, मतदारांना फोटो स्लीपचे वाटप करणे तसेच पोस्टर, बॅनर द्वारे जनजागृती करणे. ग्रामपंचातयस्तरावर ईव्हिएम-व्हिव्हिपॅट बाबत गैरसमज दूर करणे, महिला बचतगटांच्या माध्यमातून सभांचे आयोजन करून जनजागृती करावी, अशा सुचना दिल्या.
तसेच तालुकास्तरावर महाविद्यालयामध्ये निवडणूक आणि मतदानासाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन, संकल्प पत्रांचे वाटप व गोळा करणे, कॅम्पस अॅम्बेसीडरची कार्यशाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांद्वारे रॅलीचे आयोजन तसेच कलापथक, लोकनृत्य, जिंगल्स, पोस्टर बॅनरद्वारे मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी, असे सांगितले.
.जिल्हास्तरावर मानवी श्रृखंलाचे आयोजन, मतदान जनजागृती रॅली, नैतीक मतदान प्रशिक्षण, चित्रकला स्पर्धा आयोजित करणे आदी उपक्रम घेण्याबाबत सुचित केले. तसेच भंडारा, तुमसर, साकोली विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी स्विप कार्यकमाचे संनियंत्रण करून जनजागृतीचा कालबध्द कार्यकम यशस्वी करावा, असे निर्देश दिले.
या प्रसंगी भंडारा, साकोली, तुमसर येथील स्विप कार्यक्रमाचे जनजागृती बाबत करण्यात आलेले नियोजन जिल्हाधिकारी यांना सादर केले. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी मतदार वाढविण्याच्या दृष्टीने विशेष चर्चा केली.
स्वातंत्र्यदिनी जनजागृती
१५ आॅगस्ट २०१९ पासून जनजागृती कार्यक्रमाची अंमलबजावणी होत आहे. १५ आॅगस्टला स्वातंत्र्यदिनी होणाºया ग्रामसभेमध्ये मतदान यादींचे वाचन, मतदान यादी शुध्दीकरण, मतदान यादींमध्ये फोटो अपडेट करणे, मतदान यादीत नाव तपासून घेणे, दुबार, मयत, स्थानांतरीत करणे, मतदान प्रक्रियेता बोगस मतदान होणार नाही याबाबत सर्तकता राखणे, निर्भयपणे मदान करणे, मतदान प्रक्रियेत कोणत्याही प्रलोभनास बळी न पडणे याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.