न्यायासाठी राजेगाव वासीयांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 01:02 AM2018-10-05T01:02:46+5:302018-10-05T01:07:11+5:30
तालुक्यातील राजेगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या अशोक लेलँड कारखाणा व्यवस्थापनाने चुकीच्या पध्दतीने २६ एकर जमीन बळकावून अनाधिकृत अतिक्रमण केल्याने ते हटविण्यात यावे, या मागणीसाठी राजेगाव वासीयांनी बुधवारला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : तालुक्यातील राजेगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या अशोक लेलँड कारखाणा व्यवस्थापनाने चुकीच्या पध्दतीने २६ एकर जमीन बळकावून अनाधिकृत अतिक्रमण केल्याने ते हटविण्यात यावे, या मागणीसाठी राजेगाव वासीयांनी बुधवारला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोर्चेकरी व व्यवस्थापनामध्ये वाद समोपचाराने न मिटविता व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्याने अरेरावी केल्यामुळे प्रकरण अधिक चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दुपारी शेकडो राजेगाववासी व परिसरातील नागरिक येथील जलाराम मंगल कार्यालयासमोर एकत्र आले. तिथून घोषणाबाजी करीत थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा धडकला. येथे मोर्चाचे रुपांतर सभेत करण्यात आले. सभेला सरपंच अनिता शेंडे, नरेश शेंडे, कुंजन शेंडे, मनोहर सार्वे, शशिकांत भोयर, दिनेश वासनिक, भानुदास सार्वे, तुळशीराम गेडाम, दिलीप मोटघरे, इंजि. त्र्यंबक घरडे, संजीव भांबोरे, शालीक गंथाडे, शारदा गथांडे, तुकाराम झलके आदींनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, अशोक लेलँड कंपनीने राजेगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेली जमीन अतिक्रमणाच्या माध्यमातून हडप केली आहे, असा जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्ट आहे.
या जमिनीसंदर्भात एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी अशोक लेलँडने २६ एकर जमीन ही एमआयडीसीची नसल्याची यापुर्वीच स्पष्ट केले आहे. अतिक्रमणाच्या मुद्यावर राजेगावच्या पदाधिकाऱ्यांसोबत कारखाना व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी चर्चा करुन तोडगा काढावा, यासाठी अनेकदा सभेचे आयोजन करण्यात आले. मात्र कारखाना व्यवस्थापनाचा कोणताही अधिकारी सभेला उपस्थित राहत नाही. उलट अरेरावीची उत्तरे दिले जात आहे.
याविषयी जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून न्यायाची मागणी करण्यात आली. मात्र न्याय मिळत नसल्याने राजेगाव वासीयांनी बुधवारला धडक मोर्चा काढला. सायंकाळी शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांशी भेट घेवून मागण्यांचे निवेदन सोपविले.
बोरडकरविरुध्द अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवा
अतिक्रमणाच्या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी सरपंच अनिता शेंडे यांनी कारखाना व्यवस्थापकांना ग्रामपंचायत येथे येण्याचे आमंत्रण दिले. मात्र व्यवस्थापकाने जातीवाचक शब्द बोलून अपमानीत केले आहे. त्यामुळे त्यांच्या विरुध्द अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करुन अटक करण्यात यावी, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवदेनातून केली आहे. मोर्चेकऱ्यांत राजेगाव एमआयडी परिसरातील शेकडो नागरिक सहभागी झाले.
आतापर्यंत झालेल्या सभांमध्ये राजेगाववासीयांचे बारा-तेरा प्रतिनिधी, कारखान्याकडून चार-पाच प्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाच्या पाच-सहा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चर्चा झालेली आहे. सरपंचांची जातच माहित नसून त्यांना शिवीगाळ केली हे म्हणणे तथ्यहिन आहे.
-अरविंद बोरडकर, व्यवस्थापक, अशोक लेलँण्ड कारखाना, गडेगाव.