विरली परिसरात १४६ पाॅझिटिव्ह, तीन जण ठरले कोरोनाचे बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:44 AM2021-04-30T04:44:48+5:302021-04-30T04:44:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विरली (बु.) : लाखांदूर तालुक्यातील विरली (बु.) परिसरात कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढला असून ८७० नागरिकांच्या कोरोना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
विरली (बु.) : लाखांदूर तालुक्यातील विरली (बु.) परिसरात कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढला असून ८७० नागरिकांच्या कोरोना चाचणीत १४६ रुग्ण पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. बुधवारपर्यंत १२१ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून सद्यस्थितीत या परिसरात २५ क्रियाशील रुग्ण आहेत. दरम्यान, या परिसरातील १०-१२ रुग्णांनी जीव गमावला असून, यातील ३ जणांचा कोरोनाने तर उर्वरित रुग्णांचा कोरोना संशयित असताना मृत्यू झाला.
विरली (बु.) आरोग्य उपकेंद्रांतर्गत या परिसरातील विरली (बु.), विरली (खुर्द), ईटान आणि क-हांडला अशी चार गावे येतात. या चार गावातील सुमारे ७,५०० हजार लोकांच्या आरोग्याची जबाबदारी या उपकेंद्रावर आहे. शासनामार्फत कोरोनावर प्रतिबंधात्मक उपचार म्हणून ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या लसीकरण मोहिमेंतर्गत सदर चार गावांत बुधवारपर्यंत ७८२ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यात विरली (बु.) येथील ५४७ नागरिकांचा समावेश आहे.
या परिसरात आढळलेल्या १४६ पाॅझिटिव्ह रुग्णांमध्ये १२६ रुग्ण विरली (बु.) येथील आहेत. विरली (खुर्द) येथे ११, ईटान येथे ४ तर क-हांडला येथे ५ रुग्ण पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. या परिसरातील ३ कोरोना बळींपैकी २ विरली (बु.) येथील तर क-हांडला येथील एक रुग्ण कोरोनाचा बळी ठरला. कोरोनावर प्रतिबंधात्मक उपचार म्हणून कोरोना लसीकरण हाच एकमेव पर्याय उपलब्ध आहे. मात्र, या लसीविषयी परिसरात विविध अफवांना उधाण आल्यामुळे सर्वसामान्य जनतेत लसीकरणाविषयी उदासीनता दिसून येत आहे. आरोग्य विभाग व स्थानिक लोकप्रतिनिधी लसीकरणाविषयी जनजागृती करीत आहेत. मात्र, जनतेच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या नाकीनऊ येत आहेत.
बॉक्स
कोरोना चाचणीचा वेग मंदावला
अँटिजेन टेस्ट किटचा तुटवडा असल्यामुळे या उपकेंद्रात पुरेशा प्रमाणात किट उपलब्ध नाहीत. त्यामुळे येथे कोरोना चाचणीचा वेग मंदावला आहे. ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत आहेत अशाच रुग्णांची कोरोना चाचणी करण्याचे आरोग्य विभागाचे आदेश आहेत. मात्र, यापूर्वी लक्षणे न आढळताही अनेक रुग्ण पाॅझिटिव्ह येत होते आता अशा प्रकारच्या रुग्णांचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी येथे कोरोना विषाणूंचा संसर्ग खरोखरच कमी झाला काय, याविषयी शंका आहे.
कोट बॉक्स
कोरोनापासून बचावासाठी लस हाच एकमेव उपाय आहे. या लसीमुळे अद्याप कोणाचाही मृत्यू झालेला नाही. तसेच या लसीमुळे काही लोकांना येणारा ताप पॅरासिटेमाॅलच्या गोळ्यांमुळे आराम होतो. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरण करून घ्यावे.
- डाॅ. विवेक बन्सोड, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य उपकेंद्र, विरली (बु.)