भंडारा जिल्ह्यात प्रथमच आढळला दुर्मीळ ‘ब्लॅक स्टार्क’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2022 07:00 AM2022-02-22T07:00:00+5:302022-02-22T07:00:03+5:30
Bhandara News गत दोन दशकांपासून भंडारा-गोंदिया जिल्ह्यात स्थलांतरित पाणपक्ष्यांची गणना करीत असतानाच पक्षी निरीक्षणातून दुर्मीळ असलेला ‘ब्लॅक स्टार्क’ (काळा करकोचा) भंडारा जिल्ह्यात प्रथमच आढळला आहे.
चंदन मोटघरे
भंडारा : गत दोन दशकांपासून भंडारा-गोंदिया जिल्ह्यात स्थलांतरित पाणपक्ष्यांची गणना करीत असतानाच पक्षी निरीक्षणातून दुर्मीळ असलेला ‘ब्लॅक स्टार्क’ (काळा करकोचा) भंडारा जिल्ह्यात प्रथमच आढळला आहे. लाखनी तालुक्यातील निहारवाणी (डोंगरगाव) तलाव व भंडारा तालुक्यातील रावणवाडी जलाशय परिसरात त्याचे दर्शन झाले.
हा पक्षी मूळचा मध्य युरोपातील आहे. त्याची लांब चोच व लांब पाय लाल रंगाचे, तर पोटाचा काही भाग पांढऱ्या रंगाचा आणि शरीर संपूर्ण काळ्या रंगाचे असते. याचे शास्त्रीय नाव ‘सिनकोना नायग्रा’ असून, त्याची सरासरी लांबी १०० सेंमी असते. युरोपमधील कडक थंडीपासून बचाव करण्याकरिता इतर स्थलांतरित बदकांसोबत हे चार ब्लॅक स्टार्क आढळले. त्यामध्ये दोन प्रौढ नर आणि मादी, तर दोन पक्षी लहान आहेत.
जिल्ह्यात पाच वर्षांपूर्वी युरोपमधून तीन दुर्मीळ व्हाईट स्टार्क (पांढरा करकोचा) पक्षी आले होते. काळा करकोचा विदर्भातील काही जिल्ह्यांत यापूर्वी आढळला असला तरी भंडारा-गोंदिया जिल्ह्यात प्रथमच त्याचे दर्शन घडले आहे. यामुळे जिल्ह्याच्या पक्षी वैभवात अजून भर पडली आहे.
पट्टकादंब बदकांचेही आगमन
जिल्ह्यातील दोन तलावांमध्ये पाच वर्षांनंतर ‘पट्टकादंब’ अथवा ‘राजहंस’ बदके (बार हेडेड गुच) २४ च्या संख्येने आले असून, पक्षिप्रेमींमध्ये आनंदाची लहर पसरली आहे. मध्य आशिया, मंगोलिया, तिबेट, लडाख भागातील ही बदके असून, डोक्यावर असलेल्या दोन काळ्या रेषा पांढऱ्या रंगावर उठून दिसत असल्याने ती पट्टकादंब म्हणून ओळखली जातात. भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कलहंस बदक (ग्रेलॅग गुच) येतात. यासोबतच मोठी लालसरी, साधी लालसरी, चक्रवाक, शेंडी बदक, नकटा बदक, गढवाल, गारगेनी, अटला बदक, विजन बदक, सुंदर बटवा, थापट्या इत्यादी बदक युरोप व आशियातून दरवर्षी भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील विविध तलावांवर येतात.
गत वीस वर्षांपासून ग्रीनफ्रेंडस् नेचर क्लबच्या वतीने ठिकठिकाणी पाणपक्षीगणना करण्यात येते. दुर्मीळ ‘ब्लॅक स्टार्क’ भंडारा जिल्ह्यात प्रथमच आढळला आहे.
- प्रा. अशोक गायधने,
कार्यवाह, ग्रीनफ्रेंडस् नेचर क्लब, लाखनी