विरलीत कोरोनाबाधित रुग्णांची गावभर भ्रमंती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:33 AM2021-04-12T04:33:31+5:302021-04-12T04:33:31+5:30
विरली(बु.) : लाखांदूर तालुक्यातील विरली येथे कोरोना विषाणूंचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला असून, दररोज सुमारे १५ ते २० कोरोनाबाधित ...
विरली(बु.) : लाखांदूर तालुक्यातील विरली येथे कोरोना विषाणूंचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला असून, दररोज सुमारे १५ ते २० कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहे. रविवारपर्यंत येथे १०४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. मात्र, येथील काही कोरोनाबाधित रुग्ण विलगीकरणाचा पार फज्जा उडवून गावभर मुक्त भ्रमण करीत आहेत. अशा रुग्णांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, या हलगर्जीपणामुळे आपण कोरोनाविरुद्धचा लढा जिंकणार कसा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सुमारे साडेतीन हजार लोकसंख्येच्या या गावात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोफत कोरोना चाचणीची मोहीम व्यापक स्तरावर राबविली जात आहे. परिणामी बाधित रुग्णांची आकडेवारी मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहे. अशा बाधित रुग्णांना प्रशासनाने होम क्वारंटाईन किंवा संस्थात्मक विलगीकरण करण्याचे, तसेच ऑक्सिजनचे प्रमाण अत्यंत कमी आढळून आल्यास किंवा तत्सम परिस्थिती असल्यास त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्याचे आदेश दिले आहेत.
येथे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत १०४ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आल्याची माहिती येथील उपकेंद्राकडून मिळाली आहे. यापैकी काही कोरोनाबाधित रुग्णांचा गावात मुक्त संचार सुरू असून, स्थानिक प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे समजते.
कोरोनाच्या संसर्गापासून बचावासाठी बाधित झालेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन किंवा इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केले जाते. गृह विलागीकरणाच्या नियमानुसार कोरोनाबाधित व्यक्तींना किमान कोरोनाची पुनर्चाचणी निगेटिव्ह येईपर्यंत घराबाहेर न निघण्याचे व कुणाच्याही संपर्कात न येण्याची सक्ती करण्यात आली आहे. मात्र, प्रशासनाच्या नियम धाब्यावर बसवून काही विघ्नसंतोषी कोरोनाबाधित व्यक्ती राजरोसपणे गावात भ्रमण करताना दिसतात. या कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात गावातील इतर व्यक्ती आल्यास इतरांनाही याची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या रुग्णांवर देखरेख ठेवणे तितकेच महत्त्वाचे असून, प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. येथील अशा परिस्थितीमुळे जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामीण भागात प्रत्येक कुटुंबाकडे विलगीकरणासाठी वेगळ्या खोलीची व्यवस्था नसते. अशा परिस्थितीत एकत्र राहत असताना कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात कुटुंबातील इतर सदस्य येऊ नयेत आणि कोरोनाचा संसर्ग इतरांना होऊ नये या उद्देशाने ग्रामपंचायतीने विलगीकरणासाठी वेगळ्या विलगीकरण केंद्राची मागणी केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी या मागणीची तातडीने दखल घेऊन येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत विलगीकरण केंद्र सुरू करण्याची परवानगी दिली. मात्र, या विलगीकरण केंद्राकडे अनेक मनमौजी रुग्णांनी पाठ फिरविली असून, स्वतःच्या घरीच मनसोक्तपणे गृहविलगीकरणात राहणे अनेकांनी पसंत केले आहे. या विलगीकरण केंद्राचा केवळ आठ रुग्ण लाभ घेत आहेत.
बॉक्स
ग्राम शीघ्र प्रतिसाद समितीने तत्परता दाखवावी
गतवर्षी २४ मार्चला येथील ग्राम प्रशासनातर्फे येथे ग्राम शीघ्र प्रतिसाद समितीची स्थापना करण्यात आली. या समितीकडे काही जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या होत्या आणि समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्या प्रामाणिकपणे, निष्ठेने पार पडल्या. मात्र, लॉकडाऊन संपल्यानंतर या समितीचे अस्तित्वच मिटले. येथील कोरोनाबाधित रुग्णांच्या गावात मुक्त संचारावर ग्राम शीघ्र प्रतिसाद समिती नक्कीच आळा घालू शकते.