विरलीत अतिसाराची साथ!
By admin | Published: April 20, 2015 12:39 AM2015-04-20T00:39:05+5:302015-04-20T00:39:05+5:30
लाखांदूर तालुक्यातील विरली येथे मागील तीन दिवसांपासून अतिसाराची साथ सुरु आहे.
२५ जणांना रूग्णालयात हलविले : महिलेचा मृत्यू, नागरिकांमध्ये दहशत
विरली (बु.) : लाखांदूर तालुक्यातील विरली येथे मागील तीन दिवसांपासून अतिसाराची साथ सुरु आहे. गावात अतिसाराचे २५ रुग्ण आढळले असून यात एका महिलेचा मृत्यू झाल्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. अतिसार नियंत्रणासाठी येथील आरोगय उपकेंद्रात शिबिर सुरु असून येथील दोन रुग्णांवर लाखांदूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
इटाण येथील वैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय पेयजल पाणीपुरवठा योजनेमार्फत विरली येथील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येतो. आरोग्य विभागाने गावातील पिण्याच्या पाण्याची चाचणी घेतली असून सर्व नमुन्यांचा अहवाल २० एप्रिल रोजी प्राप्त होणार आहे. मात्र, प्राथमिक चाचणीत गावातील पिण्याच्या पाण्यात योग्य प्रमाणात ब्लिचिंग आणि क्लोरीन आढळल्याचे आरोग्य सहाय्यक जे. एम. कढोले यांनी सांगितले.
गावात अतिसाराची साथ सुरु होताच स्थानिक प्रशासनाने अतिसार नियंत्रणासाठी येथील आरोग्य उपकेंद्रात शिबिर सुरु केले. या आरोग्य शिबिरात सरांडी (बु.) आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रकाश जांभुळकर, डॉ. स्वाती महाजन, बेलाटी उपकेंद्राचे डॉ. प्रेमराज कुटे, आरोग्य सेवक बी. एच. उके आदींनी अतिसार बाधीत रुग्णांवर उपचार करित आहेत.
विरली येथील सुरेखा विठोबा चौधरी (३२) या महिलेचा मृत्यू झाला तसेच आकांक्षा मिलिंद हुमणे (१३) आणि जयवर्धन गुलाब रामटेके (२३) या दोघांना पुढील उपचारार्थ लाखांदुरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. (वार्ताहर)
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी केव्हा मिळणार?
येथील आरोग्य उपकेंद्रात गेल्या अनेक वर्षांपासून पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी नाही. सध्या आठवड्यातून तीन दिवस डॉ. स्वाती महाजन या उपकेंद्रात सेवा देत आहेत. साथीच्या काळात अनेक रुग्णांवर खासगी दवाखान्यात उपचार घेण्याची वेळ आली. त्यामुळे येथे अतिसाराच्या रूग्णसंख्येचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, विरली (बु.) आरोग्य उपकेंद्रात पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी केव्हा मिळणार, असा सवाल विरली व परिसरातील ग्रामवासीयांनी उपस्थित केला आहे.
येथील सुरेखा चौधरी हिचा मृत्यू अतिसाराने झालेला नसून ‘बिगो-रेमिया’ या आजारामुळे झालेला आहे. त्याचप्रमाणे प्राथमिक तपासणीत गावातील पिण्याचे पाणी योग्य असल्याचे आढळले आहे. विरली येथे सुरु असलेली अतिसाराची साथ लग्नसमारंभातील पाणी प्यायल्यामुळे किंवा वातावरणातील बदलामुळे झाली असावी, अशी शक्यता आहे.
- डॉ. प्रकाश जांभुळकर,
वैद्यकीय अधिकारी,
प्राथमिक आरोग्य केंद्र, सरांडी (बु.)