नागझिरात आढळली दुर्मिळ ‘ब्लॅक लेपर्ड’ची जोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:43 AM2021-07-07T04:43:30+5:302021-07-07T04:43:30+5:30

भंडारा : महाराष्ट्रातील गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्य किमान अपेक्षेने आश्चर्यचकित करण्यासाठी ओळखला जातो. अशा नवेगाव-नागझिरा अभयारण्यात ...

Rare pair of 'Black Leopards' found in Nagzira | नागझिरात आढळली दुर्मिळ ‘ब्लॅक लेपर्ड’ची जोडी

नागझिरात आढळली दुर्मिळ ‘ब्लॅक लेपर्ड’ची जोडी

Next

भंडारा : महाराष्ट्रातील गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्य किमान अपेक्षेने आश्चर्यचकित करण्यासाठी ओळखला जातो. अशा नवेगाव-नागझिरा अभयारण्यात दुर्मिळ ‘ब्लॅक लेपर्ड’ (काळा बिबट) आढळल्याने वनप्रेमींमध्ये उत्साह संचारला आहे. परंतु पावसाळ्यामुळे जंगल सफारी बंद पडल्याने काहीजण निराश झाले आहेत. ही दुर्मिळ बिबट्याची जोडी अभयारण्यातील ट्रॅप कॅमेऱ्यात टिपली गेली असून, हे छायाचित्र मे महिन्यातील असल्याचे प्राथमिक माहितीवरून स्पष्ट होत आहे. याबाबत अजूनपर्यंत डब्ल्यूआयआयने पूर्णत: खुलासा केलेला नाही.

दुर्मिळ असलेला ब्लॅक लेपर्ड दिसल्याने ‘मोगली’ या बालकांच्या कथासंग्रहातील काळ्या बिबट्याचे चित्रण डोळ्यासमोर उभे राहते. मागील घटनांमध्ये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि पेंच व्याघ्र प्रकल्पातील काळ्या बिबट्या आढळल्याची नोंद आहे. भारतीय वन्यजीव संस्थेतील वैज्ञानिक बिलाल हबीब यांनी ट्विटर हँडलवर बिबट्याच्या जोडीचे छायाचित्र शेअर केले आहे. यात भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा-नवेगाव टायगर रिझर्व्ह लँडस्केपचा उल्लेख केला आहे. पण या जोडप्याच्या ठिकाणी असलेल्या अभयारण्याची अचूक माहिती देण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे अधिवास नष्ट होणे आणि शिकार केल्यामुळे भारतीय बिबट्या एक असुरक्षित प्रजाती म्हणून सूचीबद्ध आहेत. त्यात या बिबट जोडीचे दिसणे एक आश्चर्याची बाब समजली जात आहे.

बिलाल हबीब यांनी ट्विटर अकाऊंटवर शेअर केलेल्या आणखी एका चित्रामध्ये याच क्षेत्रामध्ये जमिनीवर एक ‘रस्टी स्पॉटेड मांजर’दर्शविली गेली आहे. ही मांजरीची प्रजाती अर्बोरियल आणि फारच क्वचितच आढळते. भंडारा येथील नियमित वन पर्यटक आणि तसेच वन्यजीव छायाचित्रकार विवेक हुरा म्हणाले, आमच्या नागझिराकडून आलेली ही पहिली घटना आहे. नागझिरा आश्चर्यचकित आहे आणि कधीही निराश न करणारे स्थळ आहे. मेलेनिस्टिक बिबट्यांचा जनुकमध्ये एक वेगळा बदल असल्याचेही त्यांनी सांगितले.

बॉक्स

ट्रॅप कॅमेऱ्याने टिपले दृश्य

नागझिरा-नवेगाव टायगर रिझर्व्ह क्षेत्रात ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरा लावण्यात आले आहेत. या अभयारण्याचे क्षेत्र ६५० चौरस किलोमीटर आहे.

ब्लॅक लेपर्ड हा आपल्या सोबत्यासह नागझिरा-नवेगाव टायगर रिझर्व्ह (एनएनटीआर) अभयारण्यातील ट्रॅप कॅमेऱ्यात टिपला गेला. या कॅमेऱ्यात झालेल्या नोंदी डब्ल्यूआयआयकडे व भारतीय वन्यजीव संस्थेकडे पाठविल्या जातात. याबाबात वनविभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे. भारतीय वन्यजीव संस्थेतील वैज्ञानिक बिलाल हबीब यांनी ट्विटर हँडलवर बिबट्याच्या जोडीचे छायाचित्र शेअर केल्यानंतर ही बाब उघडकीस आली.

कोट बॉक्स

बिबट्यांची जोडी कॅमेरा ट्रॅप पिक्चर कॉर्टिंगमध्ये दिसू शकते. एनएनटीआर फील्ड स्टाफकडून कॅमेरा ट्रॅपचा वापर राबविला जात आहे. ‘डेटा’ विश्लेषणासाठी डब्ल्यूआयआयकडे पाठविला गेला आहे. अधिक माहिती लवकरच जाहीर केली जाईल.

- मणिकंद रामानुजम,

मुख्य वनसंरक्षक तथा फिल्ड डायरेक्टर, नागझिरा-नवेगाव टायगर रिझर्व्ह

बिबट्याच्या जोडीचे छायाचित्र नागझिरा-नवेगाव टायगर रिझर्व्हमधील नवेगाव भागातील आहे. नागझिरासाठी ही एक चांगली बातमी आहे. यामुळे नागझिरा आणि नवेगाव इको टुरिझमला चालना मिळेल.

- नदीम खान, मानद वन्यजीव संरक्षक, भंडारा.

नवेगावमध्ये विविध जैवविविधता असून, गतकाळात अनेक दुर्मिळ प्रजाती परिसरात आढळतात. नवेगाव क्षेत्रात बिबट्यांची जोडी आढळली, ही आमच्यासारख्यांसाठी मोठी पर्वणीच आहे.

- सावन बहेकर, मानद वन्यजीव संरक्षक, गोंदिया.

Web Title: Rare pair of 'Black Leopards' found in Nagzira

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.