तुरळक पाऊस व उकाड्याने जनजीवन बेहाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:16 AM2021-09-02T05:16:20+5:302021-09-02T05:16:20+5:30
करडी परिसरात गतवर्षाच्या तुलनेत अत्यल्प पाऊस झाला आहे. नाले, तलाव अजूनही रिकामेच आहे. अत्यल्प जलसाठा असल्याने भविष्यात भीषण जलसंकटाला ...
करडी परिसरात गतवर्षाच्या तुलनेत अत्यल्प पाऊस झाला आहे. नाले, तलाव अजूनही रिकामेच आहे. अत्यल्प जलसाठा असल्याने भविष्यात भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता व्यक्त होत आहेत. १ जून ते ३० ऑगस्ट कालावधीत मागील वर्षी तुलनेत या वर्षी पाऊस ७५ टक्के झाला आहे. या वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने शेतीचे बजेट बिघडला आहे. रोवणीचा कालावधी वाढल्याने शेतकऱ्यांनी कडक उन्हात सिंचनाची सोय उपलब्ध करून रोवणी आटोपली, परंतु या कालावधीत पर्याप्त पाऊस न झाल्याने शेतजमीन खुली राहिल्याने, मोठ्या प्रमाणात कचरा उगवला असून, निंदनाचा खर्च हेक्टरी सात हजार रुपयांपर्यंत येताना दिसून येत असल्याने, शेतकऱ्यांत दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळ आली आहे.
युरीया खताचा तुटवडा
करडी परिसरात निसर्गाबरोबर शेतकऱ्यांना शासन-प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका या वर्षी शेतकऱ्यांना सहन करावा लागला. पऱ्हे व रोवणीनंतर युरीया खताचा प्रचंड तुटवडा जाणवला. अनेक कृषी केंद्र संचालकांनी युरीया खताची उचल वेळेत न केल्याने खतासाठी धावाधाव झाली. अधिकचा खर्च शेतकऱ्यांना करावा लागला. धान गर्भावस्थेत येण्याच्या टप्प्यात असल्याने शेतकऱ्यांना युरीया खताची गरज आहे, परंतु अनेक कृषी केंद्रात युरीया खत उपलब्ध नसल्याने तारांबळ उडत आहे.