उचल आदेशासाठी रास्ता रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:36 AM2021-01-25T04:36:14+5:302021-01-25T04:36:14+5:30
लाखांदूर : यंदाच्या खरीप हंगामात आधारभूत धान खरेदी केंद्र अंतर्गत झालेल्या खरेदी करण्यात आलेल्या धान्याची उचल न झाल्याने तालुक्यातील ...
लाखांदूर : यंदाच्या खरीप हंगामात आधारभूत धान खरेदी केंद्र अंतर्गत झालेल्या खरेदी करण्यात आलेल्या धान्याची उचल न झाल्याने तालुक्यातील सर्व गोदामे फुल्ल झाली आहेत. या परिस्थितीत आधारभूत धान खरेदी केंद्र अंतर्गत उघड्यावर धान खरेदी सुरू झाल्याने संभाव्य हानीचा धोका टाळण्यासाठी शासनाने तात्काळ उचल आदेश निर्गमित करण्याच्या मागणीला घेऊन रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे. सदर रस्ता रोको आंदोलन येत्या २७ जानेवारी रोजी तालुक्यातील साकोली - वडसा या राज्य मार्गावरील बाराव्हा फाटा येथे माजी समाजकल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांचे नेतृत्वात व शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत केले जाणार आहे.
प्राप्त माहितीनुसार, यंदाच्या खरीपात शासनाच्या आधारभूत किंमत योजनेअंतर्गत तालुक्यात एकूण १४ आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रांतर्गत गत काही महिन्यांपासून नियमित खरेदी सुरू आहे मात्र सदर खरेदी अंतर्गत तालुक्यात एकाही केंद्राला उचल आदेश न देण्यात आल्याने सर्वचे सर्व केंद्र धान पोत्यांनी फुल्ल झाले आहेत. या परिस्थितीत तालुक्यातील काही केंद्रांतर्गत उघड्यावर धान खरेदी देखील सुरू करण्यात आली आहे.
सदर परिस्थिती लक्षात घेता शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्रांना तात्काळ उचल आदेश निर्गमित करण्याच्या मागणीला घेऊन येत्या २७ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता तालुक्यातील बारव्हा फाट्यावर रस्ता रोको आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात तालुक्यातील व परिसरातील बहुसंख्य शेतकरी बांधवांनी व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन या आंदोलनाचे आयोजन चंद्रशेखर टेंभुर्णे यांनी केली आहे.