रबी धान खरेदी केंद्रांना मुदतवाढ देण्यासाठी भंडारा जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 02:38 PM2021-06-30T14:38:13+5:302021-06-30T14:39:44+5:30
Bhandara News शासनाच्या आधारभूत धान खरेदी केंद्र अंतर्गत उन्हाळी धानाची खरेदीला मुदतवाढ देण्याच्या मागणीसाठी भंडारा तालुक्यातील बारव्हा येथे बुधवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शासनाच्या आधारभूत धान खरेदी केंद्र अंतर्गत उन्हाळी धानाची खरेदीला मुदतवाढ देण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील बारव्हा येथे बुधवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकरी सहभागी झाले आहेत.
रब्बी हंगाम आंतर्गत शासनाच्या किमान आधारभूत किंमत योजनेनुसार धान खरेदी सुरु करण्यात आली. मात्र विविध कारणांमुळे तालुक्यातील हजारो शेतकरी धान खरेदी पासून वंचित आहेत. जिल्हा पणन कार्यालयाने धान खरेदी केंद्रांना बारदाण्याचा पुरवठा केला नाही. त्यामुळे धान खरेदी बंद पडली आहे. ३० जून धान खरेेदीची अंतीम मुदत असल्याने संपूर्ण धान खरेदी होणे शक्य नाही. त्यासाठी धान खरेदी करीता मुतदवाढीच्या मागणीसाठी माजी समाजकल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.