एसपींचा कॉल अन् तांदळाची तस्करी उघड; ४९ क्विंटल तांदूळ जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2022 01:08 PM2022-09-26T13:08:52+5:302022-09-26T13:19:23+5:30
अड्याळ पोलिसांची धाडसी कारवाई
चिचाळ (भंडारा) : रेशनच्या तांदळाची काळ्या बाजारात वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती अड्याळ पोलिसांना मिळाली. त्यानुसार केलेल्या कारवाईत तांदळाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडण्यात आला. त्यात ९८ कट्ट्यांमधून ४९ क्विंटल तांदूळ आढळले. ही कारवाई पोलिसांनी शनिवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान केली.
एसपींच्या कॉलनंतर अड्याळ पोलिसांनी केलेल्या या धाडसी कारवाईने एकच खळबळ उडाली आहे. अधीक्षकांनी अवैध धंद्याबाबत माहिती देण्याचे उघड केल्यानंतर प्रतिसादही मिळत आहे. ट्रॅक्टर ताब्यात घेऊन मूल्यांकनासाठी अन्न व औषध विभाग पवनीला पाठविण्यात आले आहे. मयूर बागडे (रा. पालोरा) असे धान्य घेऊन जाणाऱ्या व्यापाऱ्याचे नाव आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाउनमध्ये जनतेला विनामूल्य मिळणारा मोफत धान्य मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांना विक्री होत असल्याच्या प्रकार पाहायला मिळाला. पालोरा येथील व्यापारी मयूर बागडे हा ट्रॅक्टर क्रमांक नसलेल्या ट्रॅक्टरने पालोरा ते भेंडाळा-आसगाव मार्गाने रेशनचे धान्य नेत असल्याची माहिती अड्याळ पोलीस स्टेशनला पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी दिली. या अनुषंगाने अड्याळ पोलिसांनी तत्काळ छापा टाकून, ट्रॅक्टर ताब्यात घेऊन अड्याळ पोलीस ठाण्यात जमा केला. ट्रॅक्टरमधून ४९ क्विंटल तांदळाचे कट्टे असा अंदाजे ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तांदळाच्या मूल्यांकनासाठी अन्न व औषधी पुरवठा विभाग पवनी येथे पाठविण्यात आले. तपास पोलीस अधीक्षक लोहित मतांनी यांच्या मार्गदर्शनात अड्याळचे ठाणेदार सुधीर बोरकुटे, पोलीस उपनिरीक्षक हरिचंद्र इंगोले करीत आहेत.
रेशन धान्य कुणाचे ?
शासनाकडून गोरगरिबांना अंत्योदय, बीपीएल, अन्नपूर्णा व एपीएल आधी कार्डधारकांना धान्य दिले जाते; तर लॉकडाऊन महामारीमध्ये शासनाकडून विनामूल्य रेशन दिले जात आहे. मात्र बरेच रेशन दुकानदार रेशन कार्डधारक व्यापाऱ्यांनाच गहू, तांदळाची विक्री करीत असल्याचे चित्र रेशन दुकानात पाहायला मिळत आहे. शासनाने रेशन दुकानावर धाड टाकून विक्री करणाऱ्या लाभार्थ्यांना रंगेहात पकडून त्या कार्डधारकांचे कार्ड रद्द करावे, अशी मागणी होत आहे.
पोलीस अधीक्षकांच्या मोबाईल नंबरने पोलिसांची दमछाक
जिल्ह्यात नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी जिल्हाभर बैठका घेऊन अवैध धंद्यांना वेसण घातली आहे. अवैध धंदे, सट्टा, जुगार व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. पोलीस अधीक्षक मतानी यांनी आपले दूरध्वनी, मोबाईल क्रमांक जनतेला दिल्याने आता अवैध धंद्यांसह काळाबाजार करणाऱ्या व्यावसायिकांना डोकेदुखी होत असून, पोलिसांची चांगलीच दमछाक होत आहे.
१८ ठिकाणी नाकाबंदी
जिल्ह्यात ऑलआऊट ऑपरेशन अंतर्गत १८ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. यात ५०२ वाहनांची तपासणी करण्यात आली असून मोटारवाहन कायद्यांतर्गत ४६ प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. ८० एटीएम केंद्रांना भेट देण्यात आली आहे.