पक्का रस्ता खोदून तयार केला कच्चा रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 12:25 AM2018-12-14T00:25:51+5:302018-12-14T00:26:22+5:30

कच्चे रस्ते डांबरी, सिमेंटचे होताना सर्वांनीच बधितले आहे. मात्र गुळगुळीत डांबरी रस्ता खोदून मुरुमाचा रस्ता तयार करण्याचा प्रकार कुणी बघीतला नसेल. हा अजब प्रकार बघायचा असेल तर तुम्हाला भंडारा शहरातील जिल्हा परिषद चौकात यावे लागेल.

The raw road made from the road by digging a paved road | पक्का रस्ता खोदून तयार केला कच्चा रस्ता

पक्का रस्ता खोदून तयार केला कच्चा रस्ता

Next
ठळक मुद्देअजब प्रकार : जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौक रस्ता दुपदरीकरणाचे भिजत घोंगडे

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कच्चे रस्ते डांबरी, सिमेंटचे होताना सर्वांनीच बधितले आहे. मात्र गुळगुळीत डांबरी रस्ता खोदून मुरुमाचा रस्ता तयार करण्याचा प्रकार कुणी बघीतला नसेल. हा अजब प्रकार बघायचा असेल तर तुम्हाला भंडारा शहरातील जिल्हा परिषद चौकात यावे लागेल. वर्दळीच्या या रस्त्याचे दुपदरीकरण रखडल्यानंतर आता तात्पुरता मुरुमाचा रस्ता करुन पुन्हा नागरिकांना मनस्ताप देण्याचा हा प्रकार आहे.
शहरातील जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौक या मार्गाचे दुपदरीकरण सध्या शहरात चर्चेचा आणि वादाचा विषय झाला आहे. बरोबर महिन्याभरापूर्वी या रस्त्याच्या चौपदरीकरण कामासाठी खोदकाम सुरु झाले. अवघ्या तीन दिवसात अर्धा किलोमीटर रस्ता एका बाजुने खोदुन काढला. त्यानंतर अचानक रस्त्याचे काम बंद झाले. नगर परिषदेचे नाहरकत प्रमाणपत्र घेतले नाही म्हणून आक्षेप घेत काम थांबविले. महिन्याभरापासून या मार्गावरुन जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहतूक कोंडी आणि अपघाताने या रस्त्यावरुन जाताना नागरिक चांगलेच धास्तावलेले दिसतात.
आता या रस्त्याचे काम कधी सुरु होईल हे कुणालाही सांगता येत नाही. शहराच्या विकासाच्या मुद्दावरुन काम थांबविल्याचा दावा नगराध्यक्षांनी केला. पंधरा दिवसांपूर्वी महामार्ग प्राधिकरण आणि नगर परिषद यांच्यात बैठक होवून तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्यात अपेक्षित यश आले नाही. एका बाजूने खोदलेला रस्ता आणि दुसऱ्या बााजूने भरधाव वाहतूक असे चित्र आहे. अशातच बुधवारी या रस्त्याच्या कामाला प्रारंभ झाल्याचे चित्र दिसले. ट्रकमधून या ठिकाणी मुरुम आणणे सुरु झाले. नागरिकांना दिलासा मिळाला. परंतु हा दिलासा औटघटकेचा ठरला. कारण या रस्त्याचे सिमेंटीकरण नाही तर मुरुम टाकून तात्पुरता तयार केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. मुरुम टाकून खोदलेला रस्ता जुन्या रस्त्याच्या समतल आणण्याचा प्रयत्न सुरु आहे.
मुरुमाचा हा तलकादू रस्ता म्हणजे नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहणे होय. जो काही वाद असेल तो वाद मिटवून नियोजनाप्रमाणे या रस्त्याचे काम होणे गरजेचे आहे. परंतु त्याऐवजी मुरुमाचा रस्ता तयार केला जात आहे. या रस्त्यामुळे अवघ्या आठ दिवसातच धुळीचे प्रचंड लोट उठतील. एखादा पाऊस आला तर चिखल होईल. त्यातुन पुन्हा अपघाताची शक्यता बळावेल.
बावीस अतिक्रमणधारकांना नोटीस
जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौक या रस्त्याच्या दुपदरीकरणासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या रस्त्यावरील २२ अतिक्रमण धारकांना नोटीस बजावली आहे. तीन दिवसाच्या आत संबंधितांनी आपले अतिक्रमण काढून टाकावे, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. संबंधित नोटीस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या उपविभागीय अभियंत्यांनी बजावली आहे. एकीकडे रस्त्याचे काम थांबले असून दुसरीकडे या नोटीस बजावल्याने आता नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रस्ता बांधकामाचे कवित्व
शहरातील जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौक या रस्त्याचे कवित्व सध्या सुरु आहे. प्रशासकीय इच्छाशक्तीचा अभावी हा रस्ता अपुर्ण आहे. एकदा मुरुम टाकलेल्या रस्त्यावरुन वाहतूक सुरु झाली की कुणी त्यावर आवाज उठविणार नाही आणि हा रस्ता पुर्णत्वास जाण्यासाठी बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांनी सामोपचाराने या रस्त्यावर मंथन करुन प्रश्न मार्गी लावण्याची गरज आहे. परंतु तसे होताना सध्या तरी दिसत नाही.

Web Title: The raw road made from the road by digging a paved road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.