रात्रभर चालून गाठली पोलंडची सीमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2022 05:00 AM2022-02-27T05:00:00+5:302022-02-27T05:00:49+5:30
युक्रेनमधील भयानक वास्तव समोर येत आहे. शुक्रवारी एका बंकरमध्ये त्यांनी आश्रय घेतला होता. त्यानंतर सायंकाळी त्यांना पोलंड सीमेवर जाण्यास सांगण्यात आले. नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीत शिकणारे शंभरावर विद्यार्थी शुक्रवारी सायंकाळी टॅक्सीच्या मदतीने पोलंडच्या सीमेकडे निघाले. मात्र, टॅक्सी चालकानेही त्यांना ३५ किलोमीटर आधीच सोडून दिले. त्यामुळे हे सर्व विद्यार्थी कडाक्याच्या थंडीत ३५ किलोमीटर अंतर चालत पोलंडच्या सीमेवर पोहोचले.
तथागत मेश्राम
लोकमत न्यूज नेटवर्क
वरठी : वसतिगृहातून पोलंड सीमेवर जाण्याचे फर्मान मिळाले. कसेबसे टॅक्सी करून सायंकाळी ५ वाजता प्रवास सुरू झाला. टॅक्सी चालकाने ३५ किलोमीटर आधीच उतरवून दिले. कडाक्याच्या थंडीत रात्रभर ३५ किलोमीटर अंतर चालून सीमा गाठली. परंतु आम्हाला मदत मिळत नाही. काका आम्हाला वाचवा, आम्हाला काही सुचत नाही, असा भावनिक संदेश वरठी येथील हर्षित चौधरीने शनिवारी पाठविला. या संदेशाने पालकांच्या पायाखालची जमीन सरकली आणि घरी चिंतेचे वातावरण पसरले.
वरठी येथील सनफ्लॅग कंपनीतील महाव्यवस्थापक अरुणकुमार चौधरी यांचा मुलगा हर्षित सध्या युक्रेनमधील पोलंड सीमेवर अडकला आहे. तो तीन महिन्यांपूर्वी लव्हिव्ह शहरात एमबीबीएस करण्यासाठी गेला होता. परंतु युद्ध सुरू झाले आणि तो तेथेच अडकला. त्याने आपल्या वडिलांना ऑडिओ क्लिप पाठविली असून, युक्रेनमधील भयानक वास्तव समोर येत आहे. शुक्रवारी एका बंकरमध्ये त्यांनी आश्रय घेतला होता. त्यानंतर सायंकाळी त्यांना पोलंड सीमेवर जाण्यास सांगण्यात आले. नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीत शिकणारे शंभरावर विद्यार्थी शुक्रवारी सायंकाळी टॅक्सीच्या मदतीने पोलंडच्या सीमेकडे निघाले. मात्र, टॅक्सी चालकानेही त्यांना ३५ किलोमीटर आधीच सोडून दिले. त्यामुळे हे सर्व विद्यार्थी कडाक्याच्या थंडीत ३५ किलोमीटर अंतर चालत पोलंडच्या सीमेवर पोहोचले.
या काळात काही जणांची प्रकृती खालावली. काहींचे मानसिक संतुलन ढासळले. आता पोलंडने सीमा बंद केल्याने जायचे कुठे? असा प्रश्न त्यांच्यापुढे पडला आहे.
मुलाच्या चिंतेत पालकांचे बेहाल
- युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या हर्षित चौधरी यांच्या वडिलांचा जीव मुलाच्या चिंतेने बेजार झाला आहे. कोणतेही काम सुचेनासे झाले आहे. कोणत्याही परिस्थितीत मुलाला कसे भारतात आणता येईल, याचीच चिंता त्यांना सतावत आहे.
संपर्क क्रमांक कुचकामी
- युक्रेनमध्ये अडकलेल्या हर्षितसह काही विद्यार्थ्यांना मदतीसाठी संपर्क क्रमांक देण्यात आले. त्यावर या विद्यार्थ्यांनी संपर्क साधला. पण त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. कडाक्याच्या थंडीत आज हे विद्यार्थी भारतात कसे परतावे, या विवंचनेत आहेत.
भावी डाॅक्टर भोगताहेत मरणयातना
- उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहत युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले भावी डाॅक्टर तेथील परिस्थितीने आता मरणयातना भोगत आहेत. पोलंड सीमेकडे थेट युद्ध नसले तरी युद्धजन्य परिस्थिती आहे. संपर्क साधणेही नाही. खाण्याच्या वस्तूंचाही तुटवडा आहे. अशा स्थितीत या सर्व विद्यार्थ्यांना मायदेशाची ओढ लागली आहे.