वाचन हा अतिशय महत्त्वाचा संस्कार!
By admin | Published: January 19, 2017 12:27 AM2017-01-19T00:27:52+5:302017-01-19T00:27:52+5:30
आजची पिढी संस्कारित नाही हा आमच्या पिढीचा आवडता आरोप आहे. पण हा अपराध आमच्याच पिढीचा आहे.
हरिश्चंद्र बोरकर : जिल्हास्तरीय ग्रंथ महोत्सव आणि विज्ञान प्रदर्शन, संगणकाच्या युगातही वाचन संस्कृती शास्वत
भंडारा : आजची पिढी संस्कारित नाही हा आमच्या पिढीचा आवडता आरोप आहे. पण हा अपराध आमच्याच पिढीचा आहे. वाचन संस्कार हा अतिशय महत्वाचा संस्कार आहे. तो पुढील पिढीत रुजविण्याची जबाबदारी आमचीच, असे प्रतिपादन जेष्ठ झाडीबाली साहित्यिक डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांनी केले.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पूणे, राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर आणि शिक्षण विभाग जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय ग्रंथ महोत्सव आणि जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन लालबहादूर शास्त्री विद्यालय येथे १८ ते २० जानेवारी या कलावधीत आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रंसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणाधिकारी माध्यमिक भाऊसाहेब थोरात होते तर प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, शिक्षणाधिकारी प्राथमिक अभयसिंह परिहार, उपशिक्षणाधिकारी संजय आयलवार, भोंगाडे, लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचे प्राचार्य डी. व्ही. देशमुख , विज्ञान प्रदर्शनीचे प्रमुख टेभूणीकर उपस्थित होते.
हरिश्चंद्र बोरकर म्हणाले, भावी पिढीला अवांतर वाचनासाठी प्रोत्साहित करावे. वाचनाचा संस्कार जीवनाची दृष्टी देतो. त्यामुळे मुलांमध्ये वाचनांची गोडी निर्माण करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. भविष्याला आकार देण्याचे सामर्थ्य केवळ ज्ञानातच आहे. लेखन ही मनाच्या अवस्थेला शब्दबध्द करण्याची प्रक्रीया आहे. यावर त्यांनी आपली स्वयंलिखीत कवितेचे वाचन करतांना
उडू नको चिमणी बाई
भरोसा तू माझा धर
तुझ घरटं माझ घर, सांगून कवितेच्या माध्यमातून आर्थिक मदत सुध्दा होते, असे त्यांनी सांगितले. साहित्यातील वेगळेपणा तूम्हाला ओळख निर्माण करुन देतो. वाचनासारखा आनंद कशातच नाही. संगणकाच्या युगातही वाचन संस्कृती शास्वत आहे, असे ही ते म्हणाले. मुलांनी केलेल्या विज्ञान प्रदर्शनाचे मोठे स्वरुप हाच संशोधनाचा पाया आहे.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते यांनी सांगितले, छोट्या छोट्या पूस्तकातूनच वाचनाची आवड निर्माण करावी. वाचनाची सवय आपल्या भावी जीवनाची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विज्ञान प्रदर्शनातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मॉडेलच्या माध्यमातून आपल्या मधील वैयक्तिकांनी ओळख करुन दिल्याचे सांगितले. प्रारंभी विद्येची देवता सरस्वती, ए.पी.जे. अब्दुलकलाम व रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन तसेच दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचे सुरुवात करण्यात आली.
प्रास्ताविक उपशिक्षणाधिकारी संजय आयलवार यांनी केले. त्यांनी जिल्हास्तरीय ग्रंथ महोत्सव व विज्ञान प्रदर्शना विषयी माहिती विषद केली. जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनातूनच राज्य व राष्ट्रीय पातळीवरील विजेते तयार होतात व त्यांच्या मधूनच उद्याचे भावी शास्त्रज्ञ निर्माण होतील, असे ते म्हणाले. यावेळी आयोजित विज्ञान प्रदर्शनीत विद्यार्थ्यांनी राष्ट्र निर्माणासाठी विज्ञान तंत्रज्ञान व गणित या विषयाचे मॉडेल सादर केले होते. विज्ञानाचा अविष्कार या प्रदर्शनीतून विद्यार्थ्यांनी साकार केला.
सकाळी ग्रंथदिंडीचा शुभारंभ शिक्षणाधिकारी भाऊसाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आला. ही ग्रंथ दिंडी नुतन महाराष्ट्र विद्यालय, गांधी चौक मार्गे निघून लाल बहादूर शास्त्री विद्यालय येथे समारोप झाला. या ग्रंथ उत्सवात ग्रंथ प्रदर्शन व विक्री सोबतच ग्रंथ दिंडी, परिसंवाद, पर्यावरण व विज्ञानावर आधारीत सांस्कृतिक कार्यक्रम, कथा-कथन व काव्यवाचन, वाद-विवाद व प्रश्न मंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)