दुर्गाबाई डोह यात्रेसाठी प्रशासन सज्ज
By admin | Published: December 31, 2015 12:29 AM2015-12-31T00:29:42+5:302015-12-31T00:29:42+5:30
मौजा कुंभली येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षीसुद्धा १४, १५ व १६ जानेवारी रोजी तीन दिवसीय दुर्गाबाई डोह यात्रा भरणार आहे.
आढावा बैठक : नाना पटोले, बाळा काशीवार यांची माहिती
साकोली : मौजा कुंभली येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षीसुद्धा १४, १५ व १६ जानेवारी रोजी तीन दिवसीय दुर्गाबाई डोह यात्रा भरणार आहे. या यात्रेला लाखो भाविक येणार यामुळे भाविकांच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज झाले असून भाविकांना सर्व सोयीसुविधा देण्यात येतील, अशी माहिती खा. नाना पटोले, आ. बाळा काशीवार, उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले, तहसिलदार शोभाराम मोटघरे यांनी कुंभली येथे आयोजित आढावा बैठकीत दिली.
विदर्भाची काशी समजल्या जाणाऱ्या कुंभली येथील दुर्गाबाईडोह यात्रेत दरवर्षी लाखो भाविक येतात. भाविकांना सर्व सुविधा देणे प्रशासनाचे काम आले. यासाठी नाना पटोले, आ. बाळा काशीवार हे जातीने लक्ष देतात. यासाठी पंधरा दिवस आधी संबंधित सर्व विभागाची आढावा बैठक बोलाविली जाते. या बैठकीत त्या त्या विभागाला कामे वाढून दिली जातात.
पार पडलेल्या आढावा बैठकीत पाणी पुरवठा विभागाला शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले, आरोग्य विभागामार्फत यात्रेतील हॉटेलमधील पाणी तपासणे, भाविकांच्या आरोग्याची तपासणी करणे, सार्वजनिक बांधकाम विभागाने यात्रेपूर्वी जाण्यायेण्याचा रस्ता दुरूस्त करणे व नदीकाठावरील बॅरीगेट्स लावावे, पोलीस विभागातर्फे यात्रेकरूची सुरक्षासह अवैध दारू, जुगार यावर आळा बसविणे, एस.टी. विभागाने जादा बसेसची सोय करावी, यासह सर्व विभागांना निर्देश देण्यात आले.
यावेळी सभापती उंदीरवाडे, उपसभापती लखन बर्वे, जिल्हा परिषद सदस्य प्राचार्य होमराज कापगते, कुंभलीच्या सरपंच विमल हुकरे, वडदच्या सरपंच मालती कापगते, परसटोला येथील सरपंच कामुना भेंडारकर, रवि परशुरामकर, बंडू बोरकर, उपविभागीय अभियंता कांबळे, उपविभागीय अभियंता पाटील, उपविभागीय अभियंता ईखार, खंडविकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी, पोलीस निरीक्षक सुरेश कुमार धुसर, कुंभलीचे तंटामुक्ती अध्यक्ष रवींद्र सोनपीपरे यांच्यासह संबंधित सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी व गावकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)