सम्यक दृष्टी, सम्यक परिश्रम जीवन मंगलमय बनविते!
By admin | Published: February 9, 2017 12:26 AM2017-02-09T00:26:21+5:302017-02-09T00:26:21+5:30
सम्यक दृष्टी, सम्यक परिश्रम, सम्यक कर्म यामुळे फलरुपी वृक्ष दुसऱ्याच्या जीवनाला मंगलमय बनवितो.
रूयाड येथे धम्म महोत्सव : भदंत होरिसावा यांचे प्रतिपादन
पवनी : सम्यक दृष्टी, सम्यक परिश्रम, सम्यक कर्म यामुळे फलरुपी वृक्ष दुसऱ्याच्या जीवनाला मंगलमय बनवितो. भदंत संघरत्न मानके यांनी बौद्ध धर्माचे अध्ययन, साधना, तपस्या केली. भारतात येऊन त्यांचे धार्मिक, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रातील कार्य पाहताना याठिकाणी लाखो लोकांची उपस्थिती पाहून भावूक झालो आहे. पत्र्त्रामेत्ता संघाचा हा महास्तूप विश्वाला शांतीचा संदेश देणारा आहे. आज जगभर दहशतवादाचा धोका निर्माण झाला असताना आज विश्वाला भगवान बुद्धांच्या शांतीच्या मार्गाची गरज आहे, असे प्रतिपादन जपानच्या राजघराण्याचे भदंत सोमोन होरिसावा यांनी केले.
महासमाधीभूमी महास्तूप, रुयाड (सिंदपुरी) येथे आयोजित ३० व्या धम्ममहोत्सवाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले मंचावर होते. अध्यक्षस्थानी पत्र्त्रा मेत्ता संघाचे अध्यक्ष धम्मदूत भदंत संघरत्न मानके होते. अध्यक्षीय भाषणात संघरत्न मानके म्हणाले, पत्र्त्रा मेत्ता संघाचे कार्य १९८२ मध्ये सुरु होवून सध्या देशातील अनेक राज्यात व नेपाळमध्ये कार्य सुरु आहे. आज ३० व्या धम्म महोत्सवात सहभागी लाखो जनता संघाच्या कार्याची साथीदार आहे. पुढेही संघ बहुजन हिताय बहुजन सुखाय करिता कार्य करीत राहील.
याप्रसंगी जपानचे मुख्य सभापती भदंत खोशोतानी, तिबेटी सरकारचे उपसभापती आचार्य येशी फुन्सोक, तेदाई संघ जपानचे मुख्य सल्लागार डॉ.भदंत ज्योको विशिओका, जपानचे अध्यक्ष डॉ.भदंत शोताई योकोयोमा, गोठनगावचे भदंत लोबझान तेंपा, जपानचे भदंत मुराखामी, भदंत आराही, भिक्खू संघाचे संघानुशासक भदंत सदानंद बौद्ध प्रशिक्षण संस्था खैरीचे अध्यक्ष भदंत सत्यशील, भदंत धम्मदीप, भदंत बुद्धघोष, भदंत ज्ञानदीप, प्रचारक भदंत नागदीपांकर, संघरामगिरीचे भदंत ज्ञानबोधी उपस्थित होते.
यावेळी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आ.रामचंद्र अवसरे, आ.जोगेंद्र कवाडे, डॉ.बालचंद्र खांडेकर, रुयाडच्या सरपंच कविता मोटघरे, सिंदपुरीच्या सरपंच प्रमोदिनी खोब्रागडे, सुभाष पारधी उपस्थित होते. पवनी शहरात आगमन होताच देश-विदेशातील भिक्खूंचे स्वागत करून शहरात रॅली काढण्यात आली. रुयाडच्या सम्राट अशोक बुद्धविहारातून सिंदपुरीच्या बौद्धांकुर विहार होऊन महासमाधी महास्तुपापर्यंत धम्म रॅली काढण्यात आली. मुख्य समारंभात बोलताना जपानच्या राजघराण्याचे बौद्धविहाराचे विहाराधिपती भदंत स्वारपहुंचा एनामी म्हणाले, संघरत्न यांचा जन्म भारतात झाला. पण ते वाढले, शिकले जपानमध्ये. त्यामुळे ते भारत व जपान या दोन देशातील दुवा आहेत. याप्रसंगी पत्र्त्रा मेत्ता बालसदन पत्र्त्रा मेत्ता स्कूल नागपूरच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत गायन, बुद्ध व भीम गीतावर नृत्य सादर केले. प्रास्ताविक धम्मानंद मेश्राम यांनी केले. संचालन अॅड.महेंद्र गोस्वामी यांनी तर आभारप्रदर्शन लोमेश सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमासाठी मनोहर मेश्राम, ब्रम्ही शिलरत्न कवाडे, अरविंद धारगावे, शिलमंजू सिव्हगडे, जयसर दहिवले, करुणा टेंभुर्णे, जयसर दहिवले, गजेंद्र गजभिये, श्रीकांत सहारे, राजराज नाईक, अॅड.गौतम उके, भदंत पेंवा जोरखू, अॅड.जयराज नाईक आदींनी केले. (शहर प्रतिनिधी)