काँग्रेसमध्ये बंडाळी
By Admin | Published: July 1, 2015 12:54 AM2015-07-01T00:54:57+5:302015-07-01T00:54:57+5:30
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशीपर्यंत काँग्रेसमधील उमेदवारी वाटपाचा तिढा सुटलेला नव्हता.
अंतर्गत वादाचा परिणाम : उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर
भंडारा : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशीपर्यंत काँग्रेसमधील उमेदवारी वाटपाचा तिढा सुटलेला नव्हता. अंतर्गत बंडाळीमुळे उमेदवारी वाटप करताना काँग्रेस पक्षश्रेष्ठींची चांगलीच दमछाक झाली असून अंतर्गत बंडाळीचा आता वाद विकोपाला पोहोचला आहे.
उमेदवारी वाटप करण्यापूर्वी सर्व पक्षांप्रमाणे काँग्रेसमध्येही मुलाखती पार पडल्या. त्यावेळी अन्य पक्षाच्या तुलनेत काँग्रेसच्या उमेदवारीसाठी मुलाखती देणारे सर्वाधिक उमेदवार होते. उमेदवारी वाटपाच्या निर्णय प्रक्रियेत विधानसभा क्षेत्रात काँग्रेसच्या चिन्हावर लढलेल्या पदाधिकाऱ्यांची आणि जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांची मते जाणून घेण्यात आली होती. दरम्यान, उमेदवारी वाटप करताना पक्षश्रेष्ठीनी काही ठिकाणी विशिष्ट उमेदवारांचा आग्रह धरला. त्यानंतर निवडणूक चिन्ह वाटप होण्याच्या दिवशी लाखनी तालुक्यातील एका जागेवर निर्णय घेण्याचे ठरले. त्यानंतर त्या उमेदवाराला पक्ष प्रभारीकडून एबी फार्म देण्यात आले. याची भणक विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे नेतृत्व करणाऱ्या पदाधिकाऱ्याला लागताच ती उमेदवारी रद्द करण्याचा आटापिटा सुरू झाला. यात उमेदवारी वाटप करताना प्रभारी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यामुळे प्रचारासाठी जिल्ह्यात आलेले नेते प्रचार अर्ध्यावर सोडून परत गेले.
प्रचाराची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, बाला बच्चन विधानसभेचे उपनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण केला होता. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हान, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, नितीन राऊत, विखे पाटील विजय वडेट्टीवार हे प्रचारासाठी येणार होते. परंतु हे नेते आता प्रचारासाठी येणार की नाही, याबद्दल काँग्रेसच्याच गोटात साशंकता आहे.
(जिल्हा प्रतिनिधी)