मुलींच्या ५० नवीन वसतिगृहांना मान्यता
By Admin | Published: February 3, 2016 12:32 AM2016-02-03T00:32:53+5:302016-02-03T00:32:53+5:30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या सुवर्ण महोत्सवी जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने राज्यात मुलींच्या नवीन ५० शासकीय वसतिगृहांना मान्यता दिली आहे.
इंद्रपाल कटकवार भंडारा
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या सुवर्ण महोत्सवी जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने राज्यात मुलींच्या नवीन ५० शासकीय वसतिगृहांना मान्यता दिली आहे. यामध्ये २५० विद्यार्थी क्षमता असलेले सात विभागीय स्तरावरील तर १०० विद्यार्थी क्षमता असलेले २२ वसतिगृह तालुका स्तरावरील राहणार आहेत. भंडारा जिल्ह्याच्या वाट्यााला दोन वसतिगृहे आली आहेत.
विदर्भात २१ वसतिगृहांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये विभागीय स्तरावरील १ तर, तालुका स्तरावर २० वसतिगृहे विदर्भात देण्यात आली आहेत.
उत्तरोत्तर होणाऱ्या शिक्षणाचा प्रसार व शिक्षणाबद्दल होणारी जागृती विचारात घेता मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
मागासवर्गीय मुला/मुलींसाठी जिल्हा व तालुका स्तरावर राहण्याची सोय नसल्यामुळे व शिक्षणाचा पुढील खर्च परवडणारा नसल्यामुळे शिक्षणापासून ते वंचित राहू नयेत, तसेच त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी म्हणून राज्यात सामाजिक न्याय विभागामार्फत शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत.
सध्या राज्यात कार्यरत असलेल्या ३८१ शासकीय वसतिगृहांपैकी मुलींसाठी १६१ वसतिगृहे कार्यरत आहेत. मुलींच्या शिक्षणाचा प्रसार व त्यांची शिक्षण घेण्याची इच्छा पाहता ही वसतिगृहे अपुरी पडत असल्याचे शासनाच्या निदशर्नास आले आहे.
या सर्व बाबीचा विचार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या सुवर्णमहोत्सवी जयंती वर्षात मागासवर्गीय मुलींना शिक्षण घेणे सोयीचे व्हावे म्हणून मुलींसाठी विभागीय स्तरावर सात वसतिगृहे सुरू करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा व तालुका स्तरावर ४३ अशी एकूण ५० नवीन शासकीय वसतिगृहे सुरू करण्यात येणार आहे. यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. ही वसतिगृहे येत्या १८ फेब्रुवारीपासून तातडीने सुरू करावेत, असे आदेश शासनाने दिले आहेत.