‘रेकाॅर्ड ब्रेक' येणार शालान्त परीक्षेचे निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:23 AM2021-06-21T04:23:23+5:302021-06-21T04:23:23+5:30

राजू बांते मोहाडी : सन २०२०-२०२१ या शैक्षणिक सत्रातील शालान्त परीक्षेचा निकाल ऐतिहासिक येणार आहे. तथापि, येणाऱ्या या निकालाबाबत ...

'Record break' will be the result of the school examination | ‘रेकाॅर्ड ब्रेक' येणार शालान्त परीक्षेचे निकाल

‘रेकाॅर्ड ब्रेक' येणार शालान्त परीक्षेचे निकाल

Next

राजू बांते

मोहाडी : सन २०२०-२०२१ या शैक्षणिक सत्रातील शालान्त परीक्षेचा निकाल ऐतिहासिक येणार आहे. तथापि, येणाऱ्या या निकालाबाबत गुणवंत विद्यार्थी नाखुशीत आहेत.

कोविड-१९ च्या प्रादुर्भावाने असामान्य परिस्थिती निर्माण झाली. २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला दहावी व बारावीच्या परीक्षा रद्द कराव्या लागल्या आहेत. आता शालान्त परीक्षेला निकाल तयार करण्याची जबाबदारी शाळांवर सोपविण्यात आली. नववीचा अंतिम निकाल, दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन तसेच दहावीचे अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन, इत्यादींच्या आधारे विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान केले जात आहे. नववीमधील १०० पैकी प्राप्त गुणांचे ५० टक्के गुणांत रूपांतर करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचे प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा या परीक्षांतील ८० गुणांपैकी प्राप्त झालेल्या गुणांचे ३० पैकी गुणांत रूपांतर करण्याच्या शिक्षण मंडळाच्या सूचना आहेत.

शैक्षणिक सत्र २०२०-२०२१ मध्ये भंडारा जिल्ह्यात विशेषतः दहावी व बारावीच्या वर्गशाळा सुरू झाल्या होत्या. ऑफलाईन अध्यापनही सुरू झाले होते. अनेक शाळांनी सराव परीक्षा सुरू केल्या होत्या. या वेळी परीक्षा सुखरूप होतील असे वाटत असताना कोविड-१९ ने डोके वर काढले. त्यामुळे शाळा पूर्णतः बंद केल्या गेल्या होत्या. जिल्ह्यातील अनेक शाळांनी दहावीचा निकाल तयार केला आहे; पण, सराव परीक्षेचे त्यावेळी मूल्यमापन झाले नाही. त्यामुळे निकाल तयार करण्यासाठी आणखी काही अवधी लागणार आहे.

निकाल तयार करण्याची संधी शाळांना मिळाली तरी विद्यार्थ्यांच्या निकालाची गुणवत्ता घसरणार आहे; कारण नववीच्या परीक्षा विद्यार्थी व शिक्षकही गांभीर्याने घेत नाहीत. फक्त उत्तीर्ण होणे मुलांना महत्त्वाचे वाटते. नववीतील संपूर्ण विद्यार्थी उत्तीर्ण झाले पाहिजेत ही काळजी विषयशिक्षक घेतात. तसेच विद्यार्थ्यांना खूप गुणांनी उत्तीर्ण झालेच पाहिजे एवढे मनातसुद्धा येत नाही. आता नववीचे नव्याने पेपर घेऊन शिक्षकांना गुण वाढविता येणार नाही. मूल्यमापन पंजीत बदल करता येणार नाही; कारण, सरलसंगणक प्रणालीवर विद्यार्थ्यांचे नववीचे गुण भरले गेले आहेत. तसेच सराव परीक्षेचे ८० पैकी ३० गुणांत रूपांतर करण्यात येणार असल्याने तिथेही फारसे गुण विद्यार्थ्यांना पडणार नाहीत. जे काही गुण वाढविता येतील ते २० गुणांच्या तोंडी परीक्षेत. एवढेच शिक्षकांच्या हाती राहिले आहे. त्यामुळे शाळांना १०० टक्के निकाल लावण्याची संधी प्राप्त झाली. ३५ टक्क्यांच्या खाली असणाऱ्या मुलांना उत्तीर्ण होणे फार अवघड होणार नाही; पण, ९० टक्क्यांच्या वर येणारी मुले फार कमी दिसणार आहेत. यावेळी १०० टक्के निकाल देणाऱ्या शाळांची संख्या वाढणार आहे. प्रशासकीय कारवाई टाळण्यासाठी शाळा स्तरावर शिक्षक वस्तुनिष्ठ मूल्यांकन करीत आहेत.

बॉक्स

अभिलेख तपासणी

शिक्षण मंडळाने दिलेली कार्यपद्धती व सूचनांचे उल्लंघन व अभिलेखात गैरप्रकार करणारे कारवाईस पात्र राहणार आहेत. त्यामुळे कारवाईचे कोलित अधिकाऱ्यांच्या हातात देण्याचे टाळले जात आहे. विशेषतः खासगी व्यवस्थापनाच्या शाळेतील व्यवस्थापन संचालक मंडळही कारवाईची संधी नेहमी शोधत असते. त्यामुळे कुणीही शिक्षक अडचणीत सापडू नये या मानसिकतेत आहेत.

बॉक्स

गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान

जे गुणवंत विद्यार्थी आहेत, ते नववीत असताना दहावीच्या अभ्यासाची तयारी करतात. केवळ पास होण्यापुरती नववीची परीक्षा देतात. अशा बऱ्याच मुलांना नववीत गुण कमी पडले आहेत. त्या गुणवंत मुलांच्या गुणांची टक्केवारी कमी येण्याची खूप शक्यता आहे. दोन वर्षे कसून अभ्यास करणारी मुले नाराजीत आहेत. त्यांना निकाल मान्य नसेल तर तशी पुन्हा लेखी परीक्षा देण्याची तरतूद शिक्षण मंडळाने केली आहे. दहावीला फारसे महत्त्व दिले जात नसल्याने पुन्हा परीक्षा देण्याच्या मानसिकतेत सध्या तरी विद्यार्थी दिसून येत नाहीत.

खासगी, पुनर्परीक्षार्थी यांचे फावणार

जे विद्यार्थी यावेळी खासगी, पुनर्परीक्षार्थी व तुरळक विषय घेऊन परीक्षेला बसले आहेत त्यांना उत्तीर्ण होण्याची खूप मोठी संधी चालून आली आहे.

कोट

या वर्षी गुणवत्तेची कसोटी लागली नाही. निकालाची तेवढी उत्सुकता नाही. गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी परीक्षा मंडळ पुन्हा देत आहे; पण आता पुन्हा परीक्षा देण्याची ती मानसिकता नाही.

छबिता भोयर

दहावीची विद्यार्थिनी मोहगाव देवी

कोट

कोविडच्या असामान्य परिस्थितीने निकाल शाळेवर सोपविला. निकाल विद्यार्थ्यांना खुश व नाखुश करून जाणार आहे. निकालाने वस्तुनिष्ठता, शाळांची प्रामाणिकपणाची कसोटी लावली आहे.

- सुनीता तोडकर

पुष्पलताबाई तोडकर विद्यालय, नरसिंहटोला

Web Title: 'Record break' will be the result of the school examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.