जिल्ह्यात विक्रमी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 01:02 AM2018-08-22T01:02:38+5:302018-08-22T01:03:33+5:30
जिल्ह्यात गत २४ तासात धोधो बरसलेल्या पावसाने हाहा:कार उडाला. २४ तासात विक्रमी ११३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यातील सातही तालुक्यात अतिवृष्टी झाली. या पावसाने अनेक घरांची पडझड झाली असून नदीनाल्यांना आलेल्या पुरांमुळे अनेक मार्ग ठप्प झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात गत २४ तासात धोधो बरसलेल्या पावसाने हाहा:कार उडाला. २४ तासात विक्रमी ११३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यातील सातही तालुक्यात अतिवृष्टी झाली. या पावसाने अनेक घरांची पडझड झाली असून नदीनाल्यांना आलेल्या पुरांमुळे अनेक मार्ग ठप्प झाले आहेत. तर भंडारा तालुक्यातील राजेदहेगाव येथे छत कोसळून पती-पत्नीसह चिमुकली झोपेतच ठार झाली. या पावसाने जणू जिल्ह्यावर आभाळ कोसळल्याचा भास होत आहे.
सोमवारी सायंकाळपासून जिल्ह्यात मुसळधार पावसाला प्रारंभ झाला. रात्रभर संततधार पाऊस कोसळत होता. या पावसाने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले. अवघ्या २४ तासात जिल्ह्यात ११३ मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस लाखनी तालुक्यात १८५ मिमी, भंडारा १५४ मिमी, मोहाडी ११६ मिमी, तुमसर ९८.४ मिमी, साकोली ९०.२ मिमी, लाखांदूर ७८.२ मिमी, पवनी ७४.४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. वार्षिक सरासरीच्या ९३ टक्के पाऊस आतापर्यंत कोसळला असून महसुलाच्या ३४ मंडळापैकी २९ मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. भंडारा तालुक्यातील राजेदहेगाव येथे एका घराचे छत कोसळून सुकरू दामोधर खंडाते (३२), सारिका सुकरू खंडाते (२८), सुकन्या सुकरू खंडाते (३) हे झोपेतच ठार झाले. यासोबतच जिल्ह्यात अनेक घरांची पडझड झाली आहे. मोहाडी तालुक्याच्या चंडेश्वरी मंदिराजवळील पुलावरून पाणी वाहत होते. तर आंधळगाव येथील गायमुख नदीला पूर आल्याने पेठ वॉर्डाशी गावाचा संपर्क तुटला. नदीचे पाणी पुलावरून वाहत आहे. मोहाडी तालुक्यात पुरात एक बैल वाहून आला. करडी ते भिलेवाडा मार्गही ठप्प झाला आहे. करडी आणि सुरेवाडा येथील पुलावरून पाणी वाहत होते. अनेक कृषी बंधारेही या पावसाने ओव्हरफ्लो झाले आहे. नांदोरा कवडसी, दवडीपार गावांचा राष्ट्रीय महामार्गाशी संपर्क तुटला. लाखनी ते चान्ना धानला या मार्गावरील पुलावरून पाणी वाहत होते. पालांदूर ते मºहेगाव पुलावरूनही पुराचे पाणी वाहत आहे. मोहाडी रोहणा, कान्हळगाव, पिंपळगाव आणि कन्हाळगाव मोहाडी हा मार्ग बंद झाला आहे. मोहाडी तालुक्यातील सात रस्ते ठप्प झाले आहेत. लाखनी तालुक्यातील जुना मऱ्हेगाव रस्ता ठप्प पडला आहे. चुलबंद नदीजवळ मºहेगाव वाकल परिसराला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मासळ येथे अनेक घरांची पडझड झाली आहे. साकोली तालुक्यात पावसामुळे ३९ घरांची पडझड झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. भंडारा तालुक्यात चांदोरी गावाचा दवडीपार व शिंगोरी गावाशी संपर्क तुटला आहे. कोंढी येथे १० व्यक्ती पुराच्या पाण्यात अडकले होते. त्यांना आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने सुखरुप बाहेर काढले. तसेच १५ जनावरांनाही सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
या पावसामुळे संपूर्ण धान शेती पाण्याखाली आली आहे. याचा फटका धानपिकाला बसणार आहे. अनेक शेतकऱ्यांचे मोटारपंप तलावावर लावले होते. रात्री झालेल्या पावसाने मोटारपंप पाण्यात बुडाले. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
सर्व मार्ग सुरळीत
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक मार्ग मंगळवारी दुपारपर्यंत ठप्प झाले होते. पंरतु पावसाने उसंत घेतल्याने दुपारनंतर जिल्ह्यातील बहुतांश मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत झाले. अनेक नदी नाल्यांना पुर आल्याने शेकडो वाहने अडकून पडली होती.
विरली शाळेत पुराचे पाणी
लाखांदूर तालुक्यातील विरली बुज. येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत मंगळवारला पाणी घुसले यामुळे एकच गोंधळ उडाला. या शाळेत २५५ विद्यार्थी शिक्षण घेत असून शाळेच्या भिंतीलगत नाला वाहतो. संततधार पावसाने नाल्याला पूर आला. त्यामुळे लगतच्या शेतातील पाणी शाळेच्या प्रांगणात शिरले. शाळेला तलावाचे रुप आले होते. पटांगणालगत एक छोटा तलाव असून यातील पाणीही पटांगणात पसरले. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळै हा तलाव बुजविण्याचे काम पूर्ण झाले नाही. सुदैवाने या पुराचा फटका विद्यार्थ्यांना बसला नाही.
गोसीखुर्दचे सर्व ३३ दरवाजे उघडले
जिल्ह्यात झालेल्या धुवाधार पावसाने वैनगंगेच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. वैनगंगा दुथडी भरून वाहत आहे. यामुळे पवनी तालुक्याच्या गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पात पाण्याची मोठी वाढ झाली. त्यामुळे या प्रकल्पाचे सर्व ३३ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले. या प्रकल्पातून २ लाख ४४ हजार ३०९ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धरणाची पातळी २४२.५७० मीटर असून जिल्ह्यातील नदीतिरावरील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
वैनगंगा धोक्याच्या पातळीजवळ
भंडारा शहराजवळून वाहणाºया वैनगंगा नदीची पाणी पातळी मंगळवारी ८.१० मिटर नोंदविण्यात आली. धोक्याची पातळी ९.५ मिटर असून वैनगंगा धोक्याच्या पातळीच्या अगदी जवळ पोहचली आहे. वैनगंगेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने वैनगंगा दुधळी भरुन वाहत आहे. वैनगंगेच्या कारधा येथे मंगळवारी सकाळी पाणी पातळी ८.१० मोजण्यात आली. परंतू गोसेखुर्द प्रकल्पाचे दरवाजे उघडल्याने चार वाजता जलस्तर खाल्यावल्याचे दिसून आले.
राजेदहेगावात घराचे छतच ठरले काळ
जवाहरनगर / खरबी नाका : मृत्यू कोणाला केव्हा आणि कसा गाठेल याचा नेम नसतो. ज्या छताखाली वर्षानुवर्ष आश्रय घेतला तेच छत एका कुटूंबीयासाठी काळ ठरले. मोलमजुरी करून जगणाऱ्या एका कुटुंबालाही मृत्यूने बेसावध क्षणी नव्हे तर झोपेतच गाठले. घराचे छत कोसळून पती-पत्नीसह तीन वर्षीय चिमुकलीचा राजेदहेगाव येथे मृत्यू झाला. विटा मातीच्या ढिगाऱ्यातील या तिघांचे मृतदेह पाहून गावकºयांच्या डोळ्यात अश्रू तरळले. प्रत्येक जण हे दृष्य पाहून हळहळताना दिसत होते. नागपूर जिल्ह्यातील निलज येथील खंडाते परिवार कामाच्या शोधात भंडारा तालुक्यातील राजेदहेगाव येथे पोहचला. गावातच एक घर भाड्याने घेऊन राहत होते. दुसºयाच्या शेतावर राबायचे आणि कुटुंबासह जीवन जगायचे. या हसत्या खेळत्या कुटुंबाला काळाने मात्र मंगळवारच्या पहाटे बेसावध क्षणी गारद केले. रात्री सकरु खंडाते, त्यांची पत्नी सारिका खंडाते आणि मुलगी सुकन्या या तिघांनी जेवण केले. बाहेर जोरदार पाऊस सुरु होता. रात्री ही मंडळी झोपी गेली. पहाटे काही कळायच्या आत काळ बनून आलेला छत त्यांच्या अंगावर कोसळले. झोपेतच या तिघांचाही मृत्यू झाला. पहाटेच्या साखर झोपेत काळाने या तिघांवर झडप घातली. मोठ्या आवाजाने गावकरी जागे झाले. धावत घटनास्थळी पोहचले. पाहतात तर काय विटा, माती आणि कवेलूच्या ढिगाऱ्याखाली तिघे जण निपचीत पडले होते. मलबा दूर सारून त्यांना बाहेर काढण्यात आले. मात्र तोपर्यंत तिघेही गतप्राण झाले होते. या घटनेची माहिती त्यांचे मुळ गाव असलेल्या निलज येथे देण्यात आली. नातेवाईकांनी राजेदहेगावकडे धाव घेतली. तिघांचे कलेवर पाहून हंबरडा फोडला. गावातील प्रत्येक व्यक्ती या तिघांचे मृतदेह पाहून अश्रू ढाळत होता. प्रत्येकजण हळहळत होता. तीन वर्षाची चिमुकली आईच्या कुशीत कायमची विसावल्याचे हृदयद्रावक दृष्य संवेदनशील मनाला हेलावून टाकत होते.