महावितरणच्या अस्तित्वासाठी वीजबिलाची वसुली आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:22 AM2021-07-05T04:22:09+5:302021-07-05T04:22:09+5:30
०४ लोक ०६ के भंडारा : ‘गोंदिया परिमंडलात थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढत्या थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक स्थिती बिकट ...
०४ लोक ०६ के
भंडारा : ‘गोंदिया परिमंडलात थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढत्या थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. महावितरण कंपनी ही देखील वीज निर्मिती व पारेषण कंपन्यांची ग्राहक आहे. महावितरणला या कंपन्यांची देयके वेळेत अदा करावी लागतात. ही देयके वेळेत न भरल्यास महावितरण कंपनीला नाहक विलंब आकार व व्याज यांचा भुर्दंड बसतो. ग्राहकांनी वीजबिल भरणा न केल्यास कंपनीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. महावितरण ही जनतेची वीज वितरण कंपनी असून ही कंपनी टिकवायची असल्यास वीज बिलाची वेळेत वसुली होणे अत्यंत आवश्यक आहे.’ असे मत कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे यांनी व्यक्त केले.
गोंदिया परिमंडलातील उपविभागीय स्तरावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी गोंदिया परिमंडलाचे मुख्य अभियंता (प्रभारी) राजेश नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रकाशगड, मुंबई येथील कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे हे गोंदिया व भंडारा जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी बैठकी दरम्यान जून महिन्यात चांगले काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच बिल भरणा केलेल्या या ग्राहकांचे कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे यांनी आभार मानले. उर्वरित ग्राहकांनी वीज बिलाची थकबाकी भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. यावेळी सर्व कर्मचाऱ्यांनी सामूहिक काम करत, वसुली मोहीम राबविताना कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही रेशमे यांनी केले.
ग्राहकांना अधिक गुणवत्तापूर्ण सेवा देण्याच्या दृष्टीने गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील चालू विकास कामांचीही पाहणी केली. ‘आयपीडीएस’ योजना, दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना यांच्या कामाची पाहणी केली. झालेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. तसेच ‘एचव्हीडीएस’ योजनेचे काम या महिन्याच्या अखेरीस पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
बॉक्स
शेतकऱ्यांनी कृषी पंप वीज धोरणाचा लाभ घ्यावा
शासनाने शेतकऱ्यांना विविध लाभ देणारे ‘कृषी पंप वीजजोडणी धोरण-२०२०’ जाहीर केले आहे. या धोरणानुसार शेतकऱ्यांना वीज बिलात मोठ्या प्रमाणात सवलत देण्यात येत आहे. थकबाकीमुक्त होण्यासाठी शेतकऱ्यांना ही चांगली संधी आहे. या योजनेची माहिती जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहचवून त्यांना या योजनेत सहभागी करून घ्यावे. याचबरोबर कर्मचाऱ्यांनी थकीत कृषी वीज बिल वसुलीकडेही लक्ष द्यावे, असे आदेश कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे यांनी दिले आहे.