अग्निशमन वाहन कर्मचारी भरती करा
By admin | Published: May 30, 2016 12:59 AM2016-05-30T00:59:04+5:302016-05-30T00:59:04+5:30
नगरपालिका कार्यक्षेत्रात दोन वॉर्डातील घरांना आग लागून मोठे नुकसान झाल्यानंतर पालिका पदाधिकारी एकवटले...
पवनी : नगरपालिका कार्यक्षेत्रात दोन वॉर्डातील घरांना आग लागून मोठे नुकसान झाल्यानंतर पालिका पदाधिकारी एकवटले व कर्मचाऱ्यांअभावी अग्निशमन वाहन लोकांना संकटसमयी कामात येत नाही याची जाणीव झाल्याने चार वर्षानंतर पहिल्यांदाच जिल्हाधिकारी भंडारा यांना निवेदन सादर केले. जिल्हा निवड समिती मार्फत कर्मचारी त्वरीत भरा अथवा कंत्राटी पद्धतीने कर्मचारी नियुक्तीस मान्यता द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र अग्नी सुरक्षा अभियान अंतर्गत नगरपालिकेला अग्निशमन वाहन देण्यात आले व कर्मचारी भरतीसंदर्भात निर्देश देण्यात आले. सहायक अग्निशमन स्थानक पर्यवेक्षक हे वर्ग ३ चे पद जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत भरावयाचे, वाहन चालक कम आॅपरेटर हे वर्ग ३ चे पद जिल्हा निवड समिती मार्फत भरावयाचे तर फायरमन हे वर्ग ४ चे पद नगरपालिका सर्वसाधारण सभेच्या परवानगीने भरावयाचे असे निर्देश देण्यात आलेले आहेत. परंतु गेल्या चार वर्षात कर्मचारी कोणी व कसे भरावयाचे यावर मंथन होत राहिले. पालिका प्रशासनाने सोयीचा अर्थ काढला व अग्निशमन वाहन कर्मचारी नसल्याने तसेच पडून राहिले. फायरमन हे वर्ग ४ चे पद सर्वसाधारण सभेने भरण्याऐवजी राजकारणापायी समिती नेमण्यात आली. त्यावरही वादंग झाले व पद भरावयाचे तसेच राहिले.
नवतपात १५ दिवसात मोठ्या मोठ्या घरांना आग लागली. लाखोंची संपत्ती जळून खाक झाली. घटनास्थळी नागरिक पालिका पदाधिकाऱ्यांना वाटेल ते बोलले. त्याचा परिणाम म्हणून जिल्हाधिकारी धीरजकुमार यांना पालिका पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ भेटले. निवेदन देऊन कर्मचारी भरतीसाठी पाठपुरावा करण्यात आला. निवेदनावर न.प. अध्यक्ष रजनी मोटघरे, उपाध्यक्ष विजय ठक्कर, नगरसेवक नरेश बावनकर, तुलसी वंजारी, धर्मेंद्र नंदरधने, भास्कर उरकुडकर, सुरेखा जनबंधू, पुष्पा भुरे, माया खापर्डे, वनिता काटेखाये यांनी स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)