शिक्षकांच्या गुणवत्तेवर होणार भरती
By Admin | Published: September 21, 2015 12:22 AM2015-09-21T00:22:46+5:302015-09-21T00:22:46+5:30
शिक्षकांच्या रिक्त जागा भरतांना खाजगी शाळा संचालकांमार्फत लक्षावधी रूपये रूपये देणग्यांच्या नावाखाली उमेदवाराकडून उकळल्या जातो.
आता खासगी शाळा शिक्षक भरतीतील भ्रष्टाचाराला ‘लगाम’ : डी.एड.बी.एड. धारकांमध्ये आशेचा किरण
राहुल भुतांगे तुमसर
शिक्षकांच्या रिक्त जागा भरतांना खाजगी शाळा संचालकांमार्फत लक्षावधी रूपये रूपये देणग्यांच्या नावाखाली उमेदवाराकडून उकळल्या जातो. त्यामुळे गुणवत्ताधारक शिक्षकांवर अन्याय होतो. मात्र आता राज्यातील माध्यमिक शिक्षकांच्या जागा भरतांना गुणवत्तेच्या आधारावर केंद्रीय निवड प्रक्रियेद्वारे खाजगी तसेच शासकीय शिक्षक भरती होणार असल्याचे संकेत राज्य परिक्षा परिषदेमार्फत मिळाल्याने, शिक्षक भरतीतील भ्रष्टाचाराला लगाम लागण्याची काही प्रमाणात चिन्हे आहेत.
गत पाच-सहा वर्षापासून प्रलंबित असलेल्या शिक्षकांच्या रिक्त जागांवर भरतीसाठी स्वतंत्र कृती कार्यालयाचे आयोजन महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेद्वारे केले जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे यांनी नुकताच एक आदेश पारित केला आहे. त्यासाठी शासनाने १४ आॅगस्ट, २९ जून व ४ आॅगस्ट २०१५ च्या संदर्भ देण्यात आला असुन मुख्यमंत्र्यानी सर्व शासकीय अधिकाऱ्यांना या संदर्भात एक कृती कार्यक्रम आखून दिला आहे. या कार्यक्रमांतर्गत खाजगी शाळांचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भरती हा विषय घेण्यात येऊन खाजगी संस्थेद्वारे चालविण्यात येणाऱ्या अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या रिक्त पदांची माहिती महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद यांना सादर करावी असे निर्देशित करुन शाळेतील पटसंख्या, आरक्षण, इतर निकष मागविले आहेत.
त्यामुळे खाजगी शाळेत नव्याने शिक्षक भर्ती करायची असल्यास प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा संचालकांनी कळविल्यानंतर महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद जाहिरातीद्वारे प्रथम उमेदवारांकडून आॅनलाईन अर्ज मागविणार, प्रश्नपत्रिका तयार करणे व लेखी परिक्षा घेऊन त्यांची पेपर तपासणी पासून तर मुलाखती व निकाल जाहीरही परिक्षा परिषद करणार असल्याने शिक्षक भरर्तीच्या नावावर खाजगी शाळा संस्था चालकांना भोपळा मिळणार आहे.
एकंदरीत ही भरती प्रक्रिया लवकरच सुरु होणार असे चिन्ह दिसत आहे. यामुळे डी.एड. व बी.एड. धारकांना सध्या आशेचा किरण दिसून येत आहेत. यापूर्वी २०१० मध्ये प्राथमिक शिक्षकांची मोठ्या प्रमाणात भरती झाली होती. मात्र त्यानंतर अद्याप पर्यंत भरती न झाल्याने डी.एड., पदवीधारक संकटात सापडले आहेत. २०१० मध्ये सीईटीद्वारे ही भरती घेण्यात आली होती.
परिक्षा उत्तीर्ण होणाऱ्यानांच भरती प्रक्रियेत समाविष्ट करण्यात येत होते. विशेष म्हणजे या परिक्षेच्या निकालाची टक्केवारी एक किंवा २ टक्केच राहत होती. त्यावरुन ही परिक्षा किती कठीण होत असेल हे दिसून येते. ही महाकठीण परिक्षा उत्तीर्ण होऊन ही नोकरी मिळेल किंवा नाही हे सांगणे अवघडच.
या संदर्भात वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरु आहेत. जिल्हाभरातील माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांची किती पदे रिक्त आहेत, याबाबत माहिती संकलनाचे काम सुरू आहे.
- किसन शेंडे,
शिक्षणाधिकारी, जि. प. भंडारा