चांदपूर पर्यटनस्थळातील सुरक्षारक्षक नियुक्तीत कपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:42 AM2021-08-18T04:42:17+5:302021-08-18T04:42:17+5:30
रंजित चिंचखेडे चुल्हाड ( सिहोरा ) : ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटनस्थळात तीन सुरक्षारक्षकांची नियुक्ती असताना, निविदाधारक कंत्राटदारांनी एकाच सुरक्षारक्षकाची ...
रंजित चिंचखेडे
चुल्हाड ( सिहोरा ) : ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटनस्थळात तीन सुरक्षारक्षकांची नियुक्ती असताना, निविदाधारक कंत्राटदारांनी एकाच सुरक्षारक्षकाची नियुक्ती केली आहे. राऊत नामक या एकाच सुरक्षारक्षकाच्या खांद्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. दोन पदे रिक्त ठेवण्यात आले असून, वेतन मात्र हडपण्यात येत असल्याचा प्रकार निदर्शनास आलेला आहे.
निविदाधारकांच्या प्रतापाने सुरक्षारक्षक हैराण झाले आहे, परंतु निविदाधारकांचे कंत्राट रद्द करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत नाहीत.
सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाच्या सुरक्षतेची जबाबदारी व सुरक्षा करण्यासाठी स्वतंत्र पद्धतीने निविदामार्फत सुरक्षारक्षकाची नियुक्ती करण्यात येत आहे. वर्षभरासाठी या निविदा काढल्या जात आहेत. ९ सुरक्षारक्षक नियुक्त करण्याचे निविदाधारकांना अटी व शर्तींना अधीन राहून सूचना दिल्या जात आहेत, परंतु निविदाधारक नियमांना पायदळी तुडवित आहेत.
सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात सुरुवातीपासून प्रकल्प स्थळाची सुरक्षा वाऱ्यावर सोडण्यात आली आहे. प्रकल्प स्थळात ४ सुरक्षारक्षक नियुक्त करण्यात आले होते. याच संधीचा फायदा घेत, चोरांनी गोडाऊनमधून ३० पाइप चोरी केले. चोरी गेलेल्या साहित्याची जबाबदारी निविदाधारक कंत्राटदारांनी घेतली नाही. यात पाठबंधारे विभागाने कुरेशी नामक कंत्राटदाराला जबाबदार धरत निविदा रद्द करण्याची कारवाई केली नाही. पाणी कुठेतरी मुरत असल्याचा अनुभव आला आहे.
दरम्यान, ‘लोकमत’ने सुरक्षारक्षक नियुक्तीत कपात प्रकरण चव्हाट्यावर आणल्यानंतर, निविदाधारक कंत्राटदाराने प्रकल्प स्थळात सुरक्षारक्षक नियुक्तीत वाढ केली आहे. रिक्त पदे भरण्याचा प्रयत्न केला आहे. सोंड्याटोला प्रकल्प स्थळात पुन्हा २ सुरक्षारक्षक नियुक्त करण्यात आले आहे. ६ सुरक्षारक्षक झाले असले, तरी २ सुरक्षारक्षकांच्या जागा भरण्यात आले नाही. ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटनस्थळाची सुरक्षा प्रकल्प स्थळात कार्यरत सुरक्षारक्षकाचे अखत्यारित येत आहे. पर्यटनस्थळात ३ सुरक्षारक्षक नियुक्त करण्याचे नियोजन आहे. या पर्यटनस्थळात देविदास राऊत नामक एकमेव सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहे. पर्यटनस्थळाची जबाबदारी एकमेव सुरक्षा रक्षकाचे खांद्यावर देण्यात आली आहे. यामुळे उर्वरित २ सुरक्षारक्षकांचे वेतन निविदाधारक कंत्राटदार हडपत असल्याचे निदर्शनास आले आहे. पाठबंधारे विभागाला ९ सुरक्षारक्षकांची यादी देण्यात आली आहे, परंतु ७ सुरक्षारक्षक प्रत्यक्षात नियुक्त करण्यात आले आहेत.
निविदाधारक कंत्राटदारांचे निविदा रद्द करण्याचा प्रयत्न होत नाही. सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पातून ३० पाइप चोरीला गेली आहेत. सुरक्षारक्षक नियुक्त असताना पाइप चोरीला जाणे दुर्दैवी असल्याचे सांगितले जात आहे. चोरीला गेलेल्या पाइपचे राशी निविदाधारक कंत्राटदाराकडून वसूल करण्यात आले नाही. कंत्राटदाराला जबाबदार धरण्यात आले नसल्याने मुजोरी वाढली आहे. यात पाठबंधारे विभागावर ताशेरे ओढले जात आहेत. कंत्राटदार आणि पाठबंधारे विभागात आलबेल प्रकार सुरू असल्याचे आरोप होत आहेत. यंदा सुरक्षारक्षकांना आत्मनिर्भरतेचे प्रशिक्षण देण्यात आले नाही. यात पैशाची बचत करण्यात आली आहे. कार्यरत सुरक्षारक्षकांना ड्रेस कोड, ओळखपत्र देण्यात आले नाही. सुरक्षारक्षक नियुक्त करताना गुणवत्ता तपासले नाही. सरसकट नियुक्ती करण्यात आली आहे. अल्प वेतनमध्ये बेरोजगार तरुण काम करण्यास तयार झाल्याने, कंत्राटदाराने प्रकल्प शेजारी वास्तव्य असणाऱ्या गावांतील तरुणांचा भरणा केला आहे. त्यांना ५ हजार रुपये महिन्याचे वेतन देण्यात येत असल्याने सुरक्षारक्षक नाराज झाले आहेत.