६३ प्रकल्पांतील उपयुक्त जलसाठ्यात घट

By युवराज गोमास | Published: May 28, 2024 11:32 AM2024-05-28T11:32:50+5:302024-05-28T11:35:06+5:30

नवतपात पारा ४३ अंशांवर : जिल्ह्यात वेळेत मान्सून न बरसल्यास जलसंकट होणार गंभीर

Reduction in useful water storage in 63 projects | ६३ प्रकल्पांतील उपयुक्त जलसाठ्यात घट

Reduction in useful water storage in 63 projects

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :
नवतपाला प्रारंभ झाल्यापासून जिल्ह्याच्या तापमानात दोन अंशांची भर पडली आहे. सध्याचे तापमान ४२ अंशांवर असून पारा ४७ अंशांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. परिणामी, जिल्ह्यातील ६३ (मध्यम, लघु व जुने मालगुजारी तलाव) प्रकल्पातील उपयुक्त जलसाठ्यात कमालीची घट झाली आहे. सध्या या प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा ३४.९३ दलघमी असून टक्केवारी २८.६८४ इतकी आहे. मान्सून वेळेत न बरसल्याने जिल्ह्यात जलसंकट आणखी गडद होण्याची शक्यता आहे.


भंडारा जिल्हा तलावांचा, जिल्हा म्हणून ओळखला जातो. जंगल टेकड्यांच्या पायथ्याशी लहान-मोठे तलाव व बोड्याची संख्या अधिक आहे. जिल्ह्यात राज्य पाटबंधारे विभागाच्या अख्यत्यरित ४ मध्यम प्रकल्प, ३५ लघु प्रकल्प, तर २८ जुने मालगुजारी तलाव आहेत. शेती सिंचनासाठी येथील तलावांचा मोठा उपयोग होतो. तलावांमुळे जिल्ह्यातून धान उत्पादक शेतकरी समृद्ध झाला आहे; परंतु जिल्ह्यातील अनेक तलावांची स्थिती दयनीय आहे. तलावांत अतिक्रमणे वाढली असून वर्षानुवर्षांपासून गाळाचा उपसा झालेला नाही. तलाव उथळ असल्याने सिंचन क्षमता कमालीने रोडावली आहे.


जिल्ह्यातील नदी, नाले कोरडे
भंडारा जिल्ह्यात वैनगंगा, बावनथडी, चुलबंद व सूर या प्रमुख नद्या आहेतः परंतु सर्वच नद्या कोरड्या पडल्या आहेत. नाल्यांत तर मार्च महिन्यापासून पाण्याचा ठणठणाट आहे. जून महिन्यात नदी काठावरील गावातील जलसंकट गंभीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

३१ लघु प्रकल्पात २३ टक्के उपयुक्त जलसाठा
जिल्ह्यात पाटबंधारे विभागाध्या अधिकार क्षेत्रात ३१ लघु प्रकल्प आहे. तलावांतील उपयुक्त जलसाठा १२.५५६ दलघमी आहे.
सद्यःस्थितीत या उपयुक्त जलसाठ्याची टक्केवारी २३.४५ इतकी आहे.

जुने मालगुजारी तलावांची स्थिती गंभीर
■ जिल्ह्यात २८ जुने मालगुजारी तलाव असून यातील पिंपळगाव तलाव वगळता सर्व तलावातील उपयुक्त जलसाठा १ दलघमीपेक्षा कमी आहे. या तलावातील एकंदर उपयुक्त जलसाठा ६.०३६ दलघमी असून टक्केवारी २३.७५८ इतकी आहे. बहुतेक लहान स्वरूपाचे तलाव कोरडे पडले आहेत.

पाणीपुरवठा योजना प्रभावित
■ जिल्ह्यातील बहुतेक ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचे पंपहाऊस तलाव, नदी व नाल्यांच्या काठावर आहेत: परंतु सद्यःस्थितीत जलसंकट वाढल्याने पाणीपुरवठा योजना प्रभावित झाल्या आहेत. अनेक गावांत दिवसातून एकदाच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.

तालुक्यातील स्थिती
प्रकल्प                                         जलसाठा                               टक्केवारी                                         

चांदपूर                                          ११.५५५ दलघमी                         ४०,०१२
बघेडा                                            १.०३८ दलघमी                           २२.८७४
बेटकर-बोथली                                १.४९० दलघमी                            ४०,६४४
सोरणा                                           २.२५२ दलघमी                           ३९.२६८ 

 

Web Title: Reduction in useful water storage in 63 projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.