ग्रामसेवकांचा कारभार स्वीकारण्यास नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 06:00 AM2019-09-14T06:00:00+5:302019-09-14T06:00:24+5:30
जबरदस्तीने शिक्षकांना या कामासाठी आदेश स्वीकारण्यासाठी भाग पाडण्याचे प्रयत्न केले गेले. त्यावर जिल्हा शिक्षक कृती समितीने कुणीही शिक्षक व केंद्रप्रमुख अशैक्षणिक कामाचे आदेश स्वीकारणार नाही, असा निर्णय घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कुणीही शिक्षक व केंद्र प्रमुख ग्रामसेवकांचा कार्यभार स्वीकारणार नाही, या जिल्हा शिक्षक कृती समितीने घेतलेल्या निर्णयाचे निवेदन जिल्हा परिषदेचे सीईओ रवींद्र जगताप यांना दिले.
शिक्षणाचा अधिकार कायद्याचे उल्लंघन करून विद्याार्थ्यांना शिकवण्याचे काम सोडून गावातील ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवकांचे कारभार पाहण्याचे आदेश पंचायत समिती स्तरावरून गट विकास अधिकारी यांनी काढले. जबरदस्तीने शिक्षकांना या कामासाठी आदेश स्वीकारण्यासाठी भाग पाडण्याचे प्रयत्न केले गेले. त्यावर जिल्हा शिक्षक कृती समितीने कुणीही शिक्षक व केंद्रप्रमुख अशैक्षणिक कामाचे आदेश स्वीकारणार नाही, असा निर्णय घेतला आहे. सोबतच सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षक आणि केंद्र प्रमुख यांचे पगार एसीबीआय या राष्ट्रीयकृत बँकेत लावण्यासाठी सर्व शिक्षकांचे खाते बीईओंमार्फत सादर करण्यासाठी पत्र काढण्याची मागणी मंजूर करून घेतली. वर्ग ५ ते ८ च्या ओबीसी मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचे आवेदन स्वीकारण्याची कार्यवाही सुरू करण्याची मागणी मंजूर करून घेतली.
याप्रसंगी कृती समिती सदस्य मुबारक सैय्यद,धनंजय बिरणवार, ईश्वर नाकडे, सुधीर वाघमारे, मुकुंद ठवकर, हरकिशन अंबादे आदी उपस्थित होते.