आईच्या कर्जाच्या थकबाकीवरून मुलाला पीक कर्ज देण्यास नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:40 AM2021-08-14T04:40:59+5:302021-08-14T04:40:59+5:30
चुल्हाड ( सिहोरा ) : आईच्या थकबाकीवरून पीक कर्ज नाकारण्याचा अनुभव सिहोरा परिसरातील भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष मोतीलाल ठवकर ...
चुल्हाड ( सिहोरा ) : आईच्या थकबाकीवरून पीक कर्ज नाकारण्याचा अनुभव सिहोरा परिसरातील भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष मोतीलाल ठवकर यांना आला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार देण्यात आली असून न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे. एरवी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी भांडणारे भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्षच पीककर्जासाठी स्वत: अडचणीत आले आहेत. आईचे पीक कर्जाचे हप्ते थकल्याच्या कारणावरून विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेने त्यांना पीक कर्ज नाकारले आहे. यामुळे त्यांची शेती धान पिकाचे लागवडीखाली आलेली नाही. संस्थेकडेच चुकारे अडले असल्याने जिल्हाध्यक्षांवर आत्मदहन करण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी भांडणारे जिल्हाध्यक्ष खुद्द स्वतःचे न्यायासाठी कर्जासाठी भटकंती करीत असल्याचे दिसत आहे.
सिहोरा परिसरातील सिंदपुरी गावात भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष मोतीलाल ठवकर यांचे वास्तव्य असून गावाशेजारी त्यांची शेती आहे. शेतीवरच कुटुंबीयांचे उदरनिर्वाह आहे. वडिलोपार्जित शेतीचे हिस्से वाटणी झाली असून जिल्हाध्यक्ष मोतीलाल ठवकर यांचेकडे कोणत्याही संस्थेचे पीक कर्ज नाही. यामुळे त्यांनी सिहोऱ्यात असणाऱ्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेकडे पीक कर्ज मंजुरीसाठी रीतसर अर्ज दाखल केला. पीक कर्जासाठी शेतीचे दस्तऐवज दिले आहे. परंतु पीक कर्ज मंजूर करण्यात आले नाही. आईच्या नावे संस्थेचे पीक कर्जाचे हप्ते थकल्याने मोतीलाल ठवकर यांना नव्याने पीक कर्ज देण्यास नकार दिला आहे. खरीप हंगामातील धानाचे चुकारे मिळाले होते. आईच्या आजारात औषधोपचारावर पैसे खर्च झाले. यामुळे पीक कर्जाची थकबाकी भरता आली नाही. ३१ मार्चला आईचेही निधन झाले. त्यामुळे उरलेले पैसेही विधीसाठी खर्च झाले. त्यानंतर त्यांनी स्वतंत्र हिस्यात असणाऱ्या शेत जमिनीवर पीक कर्जासाठी राशी मंजूर करण्यासाठी अर्ज केला. याच विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेला त्यांनी ८२ क्विंटल उन्हाळी धान दिले आहे. परंतु धानाचे चुकारे शासनाने दिलेले नाहीत. यामुळे आईचे थकबाकीचे पीक कर्जाचे हप्ते देता आले नाहीत. धानाचे अडलेल्या चुकाऱ्याची राशी २ लाखांचे घरात आहे. चुकाऱ्याची राशी याच विविध कार्यकारी संस्थेकडे अडली आहे. दरम्यान उन्हाळी धानाचे चुकारे अडले, विविध कार्यकारी संस्थेने पीक कर्ज नाकारले असल्याने त्यांनी धानाची रोवणी केली नाही. मोतीलाल ठवकर यांचे नाव शेतकरी आंदोलनासाठी परिसरात चर्चेत राहते. हे प्रकरण थेट आत्मदहनापर्यंत पोहोचले आहे. त्यांनी पीक कर्ज मंजुरीसाठी १५ ऑगस्टपर्यंत निर्णय घेण्याचे निवेदनात नमूद केले आहे. जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.
कोट
मोतीलाल ठवकर यांच्या आईकडे थकबाकी असल्याने पीककर्ज मंजुरी प्रकरण विचाराधीन ठेवण्यात आले आहे. नियमानुसार वारस असल्याने थकबाकी कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. यानंतर पीक कर्ज देता येईल.
सुरेश उताणे, अध्यक्ष विविध कार्यकारी संस्था, सिंहोरा
पीक कर्जासाठी अर्ज केले असता प्रकरण नामंजूर करण्यात आले. उन्हाळी धान याच संस्थेच्या केंद्रावर दिले. परंतु अजूनही धानाचे चुकारे मिळाले नसल्याने पीक कर्जाची थकबाकी परतफेड करता आली नाही. संस्था व शासनाच्या धोरणामुळे आत्मदहन करण्याची वेळ निर्माण झाली आहे.
मोतीलाल ठवकर, जिल्हाध्यक्ष, भारतीय किसान संघ, सिंदपुरी