राखीव जागेतून पांदण रस्ता बांधकामाला नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:37 AM2021-02-11T04:37:12+5:302021-02-11T04:37:12+5:30

रंजीत चिंचखेडे १० लोक०४ चुल्हाड (सिहोरा) : मोहगाव खंदान येथील शेतकऱ्यांना उदरनिर्वाहाकरिता वन विभागाच्या जागेतील पट्टेवाटप करण्यात आले असले, ...

Refuse construction of paved road from reserved space | राखीव जागेतून पांदण रस्ता बांधकामाला नकार

राखीव जागेतून पांदण रस्ता बांधकामाला नकार

Next

रंजीत चिंचखेडे

१० लोक०४

चुल्हाड (सिहोरा) : मोहगाव खंदान येथील शेतकऱ्यांना उदरनिर्वाहाकरिता वन विभागाच्या जागेतील पट्टेवाटप करण्यात आले असले, तरी पांदण रस्ता बांधकामास वन विभागाने मंजुरी नाकारली आहे. यामुळे शेतकऱ्यांत रोष निर्माण झाला आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीअंतर्गत रस्ता बांधकामाकरिता आधी मंजुरी घेणारे पत्रच दिले नाही, अशी माहिती वन विभागाने दिली असून, शेतकऱ्यांचे आरोप फेटाळले आहेत. यामुळे शेतकरी विरोधात वन विभाग असा प्रकार गावात निर्माण झाला आहे.

मोहगाव खंदान गावांचे शेजारी असणाऱ्या गट क्रमांक ४७४/१मधील जागेचे पट्टे गावातील नागरिकांना वाटप करण्यात आले आहेत. ही जागा कास्तकारी कामाकरिता इमारत व जडावू लकडाकरिता मुकरर करण्यात आल्याने, वन हक्क कायद्यांतर्गत शेतीकरिता पट्टे देण्यात आले आहेत. या गट क्रमांक मध्ये ७५ हेक्टर आर जागा असून, वन विभागाच्या ताब्यात आहे. या जागेतील वन अधिनियम कलमांतर्गत बाबुलाल जांभुरे, वंदना जांभुरे ०.४९ हेक्टर आर, श्रीकिशन कटरे, गीता कटरे २.२५ हेक्टर आर, परशराम कटरे, बिरनबाई कटरे १.४० हेक्टर आर, कलाबाई डडेमल, पूना डडेमल, ०.९२ हेक्टर आर, मारोती अडमाचे, सारका अडमाचे, १.६९ हेक्टर आर जागेचे वाटप करण्यात आले आहे. या शेतकऱ्यांना वहिवाटीकरिता जुन्या काळातील पांदण रस्ता आहे, परंतु या रस्त्यावर आजपावेतो माती काम झाले नाही. वन विभागाने या पांदण रस्त्याची कधी दुरुस्ती केली नाही. यामुळे रस्ता दुर्लक्षित झाला आहे. शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी पट्टे देण्यात आली असली, तरी शेतात ये-जा करण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने, ग्रामपंचायतीअंतर्गत रस्त्याच्या दुरुस्तीकरिता नियोजन तयार करण्यात आले आहे. ग्रामसभेत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पांदण रस्त्याच्या माती कामांना मंजुरी देण्यात आली आहे, परंतु माती काम करताना वन विभागाचे रीतसर मंजुरी घेण्यात आली नाही. ग्रामपंचायतीअंतर्गत तसे पत्र देण्यात आले नाही. असे कारण पुढे करीत, पांदण रस्त्याचे माती कामाला मंजुरी वन विभागाने नाकारली आहे. सातबारा दस्तऐवजात सरकार वन विभाग अशी नोंद आहे. ७५ एकर जागा असून, पैकी जागेचे वाटप करण्यात आले आहे. संपूर्ण जागेचे पट्टेवाटप करण्यात आले नाही. यामुळे निम्याहून अधिक जागा वन विभागाच्या ताब्यात आहे. हा गट क्रमांक आधी राखीव वन क्षेत्रात नसल्याने पट्टेवाटप करण्यात आले आहे.

सुधारित आदेशानुसार संपूर्ण गट क्रमांक राखीव वनात असल्याने पांदण रस्त्याचे माती काम करताना, वन विभागाची मंजुरी आवश्यक असल्याचे वन विभागाच्या वतीने सांगण्यात येत आहे, परंतु पट्टेधारक शेतकरी ऐकायला तयार नाहीत. पट्ट्यांतर्गत मिळालेल्या शेतीत शेतकरी उत्पादन घेत आहेत. त्यांना पावसाळ्यात नादुरुस्त रस्ता असल्याने कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पांदण रस्ते बांधकामाला वन विभागाने मंजुरी देण्याची मागणी होत आहे.

कोट

‘मोहगाव खंदान येथील गट क्रमांक ४७४/१ मधील जागा वन विभागाच्या ताब्यात आहे. या जागेतील पट्टेवाटप करण्यात आले असले, तरी पांदण रस्त्याचे माती काम करताना वन विभागाची मंजुरी घेण्यात आली नाही. सदर गट क्रमांक राखीव जागेत येत आहे. यामुळे सरसकट कोणत्याही कामांना मंजुरी देता येत नाही.’

- टी.एन. कावळे राउंड ऑफिसर, तुमसर

कोट

‘मोहगाव खंदान येथील पट्टेधारकांना जमिनीचे हस्तांतरण झाले असले, तरी शेत शिवारात ये-जा करण्यासाठी पक्का रस्ता नाही. यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. वन विभागाने समन्वयातून सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे.’

श्रीकिशन कटरे, जिल्हा महासचिव, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, भंडारा

Web Title: Refuse construction of paved road from reserved space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.