उन्हाळी धान विक्रीसाठी ८१५२ शेतकऱ्यांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:27 AM2021-06-04T04:27:19+5:302021-06-04T04:27:19+5:30
यंदाच्या रब्बी हंगामाअंतर्गत तालुक्यातील ६ हजार ९५९ हेक्टर क्षेत्रात उन्हाळी धानपिकाची लागवड करण्यात आली. गत काही दिवसांपासून लागवडीखालील धानाची ...
यंदाच्या रब्बी हंगामाअंतर्गत तालुक्यातील ६ हजार ९५९ हेक्टर क्षेत्रात उन्हाळी धानपिकाची लागवड करण्यात आली. गत काही दिवसांपासून लागवडीखालील धानाची कापणी व मळणीला गती आली. आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात न आल्याने शेतकऱ्यांत नाराजी व्यक्त केली जात आहे.
यंदाच्या रब्बीअंतर्गत उन्हाळी धान खरेदीसाठी जिल्हा पणन विभागाअंतर्गत तालुक्यातील ९ संस्थांअंतर्गत १५ धान खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली. या मंजुरीनुसार तालुक्यातील ६ आधारभूत धान खरेदी केंद्र खासगी सहकारी संस्थेअंतर्गत सुरू करण्यात आले आहेत. खरेदी-विक्री सहकारी संस्थेअंतर्गत ५, विजयलक्ष्मी राईस मिल संस्थेअंतर्गत ३ व पंचशील भाग गिरणी अंतर्गत १, असे एकूण मिळून १५ केंद्रांअंतर्गत उन्हाळी धानाची खरेदी केली जाणार आहे. या केंद्रांत तालुक्यातील दिघोरी (मोठी), पिंपळगाव (को), कऱ्हांडला, भागडी, डोकेसरांडी, कुडेगाव, गवराळा, हरदोली, सरांडी (बु), विरली, मासळ, बारव्हा, पारडी, लाखांदूर आदी केंद्रांचा समावेश आहे.
तथापि, शासनाद्वारे रब्बीअंतर्गत उन्हाळी धान खरेदी प्रक्रियेत संस्थेना सुलभता उपलब्ध होण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना सातबाराचे ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य केले. मात्र, राज्य शासनाच्या अन्न धान्य पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाद्वारे ऑनलाईन नोंदणी करूनदेखील शासनाला धान खरेदी बंधनकारक नसल्याने शेतकऱ्यांत एकच खळबळ माजली आहे.
दरम्यान, धान खरेदी केंद्राअंतर्गत गत ३१ मार्चपर्यंत तालुक्यातील केवळ ८ हजार १५२ शेतकऱ्यांची सात-बाराची ऑनलाईन नोंदणी झाली असून तालुक्यातील काही शेतकऱ्यांची नोंदणी न झाल्याने त्यांनी धान खरेदीपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली आहे.
बॉक्स
ऑनलाईन नोंदणीच्या तारखेत दिली होती मुदतवाढ
यंदाच्या रब्बी अंतर्गत लागवडीखालील उन्हाळी धान खरेदीसाठी शासनाद्वारे गत ३० एप्रिल पर्यंत सातबाराच्या ऑनलाईन नोंदणीची तारीख ठरविली होती मात्र ऑनलाईन नोंदणीत वेगवेगळ्या अडचणी येत असल्याने सदर कालावधीत ३१ मे पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली होती. दरम्यान तालुक्यातील जवळपास ८ हजार १५२ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली असुन तालुक्यातील अन्य शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी शिल्लक आहे.