जादा शुल्क घेणाऱ्या सहा सेतू केंद्रांची नोंदणी रद्द
By admin | Published: June 16, 2017 12:23 AM2017-06-16T00:23:02+5:302017-06-16T00:23:02+5:30
येथील सेतू सेवा केंद्रात विविध प्रमाणपत्रांसाठी नागरिक तसेच विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्या सहा सेतू केंद्राची नोंदणी
जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : तक्रार निवारणासाठी १०७७ क्रमांकावर संपर्क साधा
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : येथील सेतू सेवा केंद्रात विविध प्रमाणपत्रांसाठी नागरिक तसेच विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्या सहा सेतू केंद्राची नोंदणी तहसीलदार संजय पवार यांनी आज रद्द केली आहे.
सेतू सेवा केंद्रात अतिरिक्त शुल्क आकारल्या जात असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार यांना प्राप्त झाल्या. त्या अनुषंगाने भंडारा तालुक्यातील सेतू सेवा केंद्राची नायब तहसीलदार यांच्या मार्फत चौकशी केली. चौकशी अहवाल भंडारा तहसीलदार यांना प्राप्त झाला असून सहा सेतू केंद्रामध्ये तयार करण्यात येणाऱ्या दाखल्यांकरिता लागणाऱ्या दराबाबत माहिती दर्शविणारे दर फलक लावण्यात आले नाही. तसेच सुविधा केंद्रामध्ये शासकीय दरापेक्षा जास्त रक्कम २०० ते ३०० रुपये अर्जदारांकडून घेतली जात असल्याचे चौकशीत निदर्शनास आले.
यावरून ममता चरडे गणेशपूर, प्रवीण पत्तेवार ओम बुक डेपो शास्त्री नगर भंडारा, मोहम्मद सर्फराज नवाज, पटेल मेडीकल टिळक वॉर्ड, भंडारा, वसंत काकडे राजीव गांधी चौक भंडारा, प्रियंका जोशी काशी किराणा स्टोर्स भंडारा, सेतू केंद्र कोचे गॅस गोडाऊनजवळ खोकरला या सहा केंद्राची नोंदणी तहसीलदार भंडारा यांनी रद्द केली आहे.
नागरिकांना लागणाऱ्या विविध दाखल्यांसाठी प्रशासनाने सेतू सेवा केंद्राची निर्मिती केली असून या सेतू सेवा केंद्रात प्रत्येक दाखल्यासाठी किती पैसे आकारले जातात. या माहितीचा ८/४ चा दर फलक प्रत्येक सेतू केंद्रावर लावावा, अशा सूचना जिल्हाधिकारी भंडारा यांनी दिल्या आहेत. वय, राष्ट्रीयत्व आणि डोमोसाईल प्रमाणपत्रासाठी ३३ रुपये, वरिष्ठ नागरिक प्रमाणपत्र ३३ रुपये, निवासी दाखला ३३ रुपये, उत्पन्नाचा दाखला ३३ रुपये, सातबारा २३ रुपये, आठ अ २३ रुपये, जात प्रमाणपत्र ५६ रुपये, नॉन क्रिमिलीअर ५६ रुपये आणि नॉन क्रिमिलीयर रिनीव्हल ३३ रुपये असे शासनाचे दर आहेत. या व्यतिरिक्त कुठलेही शुल्क नागरिकांनी अदा करू नये. सेतू केंद्रात यापेक्षा जास्त शुल्क मागितल्यास तहसील कार्यालय ०७१८४-२५२२१० व जिल्हाधिकारी कार्यालय येथील १०७७ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन तहसीलदार संजय पवार यांनी केले आहे. जिल्ह्यातील कुठल्याही सेतू केंद्रावर निर्धारित दरापेक्षा अधिकचे शुल्क न आकारण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिल्या असून असे शुल्क आकारणाऱ्या सेतू केंद्राची नोंदणी तात्काळ रद्द करण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले आहेत.