नियमित कर्जदार ५० हजाराच्या प्रोत्साहन अनुदानापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:35 AM2021-04-11T04:35:02+5:302021-04-11T04:35:02+5:30
कोका येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेने महात्मा ज्योतीबा फुले कर्जमुक्ती योजना सन २०२० करीता मृतक शेतकऱ्यांचे वारसांनी पोर्टलवर ...
कोका येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेने महात्मा ज्योतीबा फुले कर्जमुक्ती योजना सन २०२० करीता मृतक शेतकऱ्यांचे वारसांनी पोर्टलवर नाव सुद्धा चढविले. परंतू अजुनही त्यांना कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र ठरविण्यात आलेले नाहीत. तसेच अनेक शेतकऱ्यांना अजूनही कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळालेला नाही. ही परिस्थिती करडी, पालोरा, देव्हाडा व मुंढरी परिसरातील शेतकऱ्यांची दिसत आहे.
शासनाने कर्जमुक्ती योजना राबविताना नियमीत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून ५० टक्के अनुदानाची घोषणा त्याच दरम्यान केली होती. नियमीत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देवून न्याय देण्याचे ठोस आश्वासन दिले होते. परंतू वर्ष लोटले असतांना अजुनही या घोषणेची प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली नाही. मयत शेतकऱ्यांच्या वारसांची नेमणूक झाली असतांना त्यांना सुद्धा कर्जमुक्ती योजनेपासून वंचीत ठेवण्यात आल्याने शेतकऱ्यांत नाराजीचा सूर आहे. शासनाने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना याबाबत निवेदन दिले होते. शासनाने अनेकदा दिलेली आश्वासने हवेत विरली आहेत. कोरोना संकट वाढले असतांना शेतकरी अडचणीत आहेत. तरीही प्रशासनाकडून अजून मदत मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणींना वाचा फोडण्यासाठी कोका परिसरातील शेतकऱ्यांनी कोका येथे आमदार नरेंद्र भोंडेकर यांना निवेदन दिले आहे. यावेळी शेतकरी तेजराम तिडके, रविंद्र तिडके, तुकाराम हातझाडे, उत्तम कळपाते, सरपंच सरीता कोडवते, माजी सरपंच संजय कोडवते व अन्य शेतकरी उपस्थित होते.