१४ वर्षांनंतर मिळाले नियमित वैद्यकीय अधीक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 10:32 PM2018-06-30T22:32:07+5:302018-06-30T22:32:29+5:30
येथील ग्रामीण रुग्णालयात नियमित वैद्यकीय अधिकारी येण्यासाठी एका तपाची प्रतीक्षा करावी लागली. तब्बल १४ वर्षांनतर मोहाडी ग्रामीण रुग्णालयाला नियमित वैद्यकीय अधिकारी प्राप्त झाले आहे. यावरुन शासन आरोग्य विभागाकडे बघण्याचा दृष्टीकोन गंभीरतेने घेत नाही याचा प्रत्यय येतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : येथील ग्रामीण रुग्णालयात नियमित वैद्यकीय अधिकारी येण्यासाठी एका तपाची प्रतीक्षा करावी लागली. तब्बल १४ वर्षांनतर मोहाडी ग्रामीण रुग्णालयाला नियमित वैद्यकीय अधिकारी प्राप्त झाले आहे. यावरुन शासन आरोग्य विभागाकडे बघण्याचा दृष्टीकोन गंभीरतेने घेत नाही याचा प्रत्यय येतो.
ग्रामीण रुग्णालय मोहाडी येथे १० जानेवारी २००४ नंतर नियमित वैद्यकिय अधिकारी मिळाले नाही. डॉ. पी.आर. निखाडे यांच्यानंतर वैद्यकिय अधिकाऱ्यांची जागा रिक्तच राहिली. डॉ. मनिषा बांते, डॉ. ए. व्ही. मानकर, डॉ. आशिष खोब्रागडे, डॉ. एच. के. हेडावू, डॉ. ए. के. बोरकर यानंतर पुन्हा सर्वाधिक आठ वर्षाचा काळ डॉ. हंसराज हेडावू यांनी प्रभारी वैद्यकिय अधिकारी म्हणून काम पाहिले. डॉ. बी. सी. मालवीय यांचा १० वर्षे ४ महिने व डॉ. पी. आर. निखाडे यांचा पाच महिन्याचा काळ वगळता यापूर्वी सुध्दा ११ वर्षे ग्रामीण रुग्णालयाचा कारभार प्रभारी वैद्यकिय अधिकारी यांच्या कार्यप्रणालीवर अनेकांनी प्रश्नचिन्हे उभे केले होते. तरी त्यांची राजकीय पाठराखण करण्यात आली. त्यांनी आपल्या काळात अनेक लोकांना वय वाढवून वयाचे दाखले दिले.
संजयगांधी निराधार योजनेसाठी वय वाढविणारे अनेक दाखले देण्याचा प्रताप डॉ. हंसराज हेडावू यांनी केला. यावर आरोग्य विभागाने काहीही कार्यवाही केली नाही. मागील आठ वर्षात नुसता मनमर्जीचा ग्रामीण रुग्णालयात कारभार सुरु होता. आता तरी वैद्यकिय अधिक्षक डॉ. बी.ए. चव्हाण यांच्या येण्याने मोहाडी रुग्णालयाला छान दिवस येतील, काय असा आशावादी प्रश्न विचारला जात आहे.
फलकावर हेडावूच
डॉ. बी.ए. चव्हाण वीस दिवस होवून वैद्यकिय अधिकारी पद सांभाळत आहेत. तथापी, आजही फलक व पाटीवर वैद्यकिय अधिक्षक म्हणून डॉ. हंसराज हेडावू यांचाच नाव दिसून येत आहे.