अर्जुनीचे पुनर्वसन, टोली वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 10:54 PM2018-10-13T22:54:20+5:302018-10-13T22:55:00+5:30

वैनगंगा नदीतिरावरील अर्जुनी गावाचे पुनर्वसन पुर्णत: करण्यात आले. मात्र याच गावाचा एक भाग असलेल्या अर्जुनी टोली पुनर्वसनापासून वंचित आहे. ४५० लोकवस्ती असलेल्या या टोलीतील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शासनाने केलेले सर्वेक्षण चुकीचे असल्याचा आरोप करीत नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Rehabilitation of Arjuna, deprived of Tolly | अर्जुनीचे पुनर्वसन, टोली वंचित

अर्जुनीचे पुनर्वसन, टोली वंचित

Next
ठळक मुद्देचुकीचे सर्वेक्षण : नागरिकांमध्ये संताप, आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : वैनगंगा नदीतिरावरील अर्जुनी गावाचे पुनर्वसन पुर्णत: करण्यात आले. मात्र याच गावाचा एक भाग असलेल्या अर्जुनी टोली पुनर्वसनापासून वंचित आहे. ४५० लोकवस्ती असलेल्या या टोलीतील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शासनाने केलेले सर्वेक्षण चुकीचे असल्याचा आरोप करीत नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
१९९४ साली आलेल्या महापुराने व गोसी प्रकल्पामुळे नदीकाठावरील गावांचे पुनर्वसन करण्यात आले. त्यापैकी भंडारापासून १५ कि.मी. अंतरावर असलेल्या अर्जुनी, जाख, खोलापूर या गावांचे शासकीय नियमानुसार सर्वेक्षण करून त्यांचे पुनर्वसन कारधानजीक गिरोला या गावी करण्यात आले. परंतु अर्जुनी येथील काही लोक जवळच असलेल्या अर्जुनी टोली या ठिकाणी राहत असतात. शासकीय सर्वेक्षण होत असताना त्यांना वगळण्यात आले. या ४५० लोकवस्ती असलेल्या अर्जुनी येथील लोकांचे अद्यापही पुनर्वसन झाले नाही. त्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. अर्जुनी टोली या गावाजवळ अर्धा कि.मी. च्या आत गोसी धरणाचे पाणी येते. येथील लोकांच्या ८५ टक्के जमीनी या धरणाच्या पाण्याखाली आल्या आहेत. शासकीय नियमानुसार या गावांचे अर्धा कि.मी. पर्यंत धरणाचे पाणी येत असेल व ८५ टक्के जमिनी धरणाच्या पाण्याखाली असतील त्यांचे १०० टक्के पुनर्वसन केले जाते.
गोसी धरणाचे अडवलेले पाणी गावाजवळ येत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. जंगली हिंस्त्र प्राणी व जलचर प्राणी गावात येत असल्याने नागरिकांत भीतीचे प्रमाण वाढले आहे.
अर्जुनी टोली हा अर्जुनी गावाचाच एक भाग असून या गावाची लोकसंख्या ४५० इतकी आहे. हे गाव १०० टक्के पुनर्वसीत असूनसुद्धा शासनाच्या चुकीच्या सर्वेक्षणाने पुनर्वसनापासून वंचित राहिले आहे. या बाबीकडे शासनाने लक्ष दिले नाही तर प्रहार संघटना रस्त्यावर उतरून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अर्जुनी टोली येथील गावकऱ्यांचे पुनर्वसन करावे या मागणीसाठी प्रहार जनशक्तीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर मंगेश वंजारी, अशोक फुले, चंद्ररेखा गाढवे, वासुदेव तुमसरे, संजय राघोर्ते, सोमेश्वर राघोर्ते, नरेश राघोर्ते, दिनेश गाढवे, कमलाकर गाढवे, ताराचंद सातपैसे, रामचंद्र गाढवे, देवीदास राघोर्ते, गोपीका निकुडे, चेतन राघोर्ते आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Rehabilitation of Arjuna, deprived of Tolly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.