प्रसुतीपश्चात बाळंतीण मृत्यू प्रकरणी नातेवाईकांचा ठिय्या आंदोलन; जिल्हा सामान्य रूग्णालयातील प्रकार

By युवराज गोमास | Published: December 5, 2023 02:19 PM2023-12-05T14:19:35+5:302023-12-05T14:20:20+5:30

जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिले चौकशीचे आदेश

Relatives protest in case of death of baby after delivery; Type in District General Hospital | प्रसुतीपश्चात बाळंतीण मृत्यू प्रकरणी नातेवाईकांचा ठिय्या आंदोलन; जिल्हा सामान्य रूग्णालयातील प्रकार

प्रसुतीपश्चात बाळंतीण मृत्यू प्रकरणी नातेवाईकांचा ठिय्या आंदोलन; जिल्हा सामान्य रूग्णालयातील प्रकार

भंडारा : प्रसुतीपश्चात बाळंतीण मृत्यू प्रकरणी सोमवारला जिल्हा सामान्य रूग्णालयात नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन केले. डॉक्टरांच्या निष्कळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला. मध्यरात्रीपर्यंत आंदोलन सुरू होते. अखेर पोलिस प्रशासन व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपचंद सोयाम यांच्या मध्यस्थीमुळे नातेवाईकांनी मृतदेह रूग्णालयातून हलविले. प्रकरणी उच्चस्तरीय नि:ष्पक्ष चौकशी समिती गठीत करण्याचे आश्वासन देण्यात आले. मृतक तरूणीचे नाव प्रतीक्षा अनिकेत उके (२२) रा. टाकळी (खमारी), असे आहे.

प्रतीक्षा उके हीला २९ नोव्हेंबर रोजी नातेवाईकांनी जिल्हा सामान्य रूग्णालयात बाळंतपणासाठी भरती केले होते. ३० नोव्हेंबरला सीझर बाळंतपण करण्यात आले. प्रतीक्षाने एका गोंडस बाळला जन्म दिला. सध्या बाळ रूग्णालयात उपचारार्थ आहे. प्रसुतीपश्चात उपचार सुरू असतांना ३ डिसेंबर रोजी तीची अचानक प्रकृती बिघडली. प्रकृती आणखी नाजूक दिसून येताच डॉक्टरांचे सल्ल्याने तीला नागपूर येथील मेडीकल कॉलेजला हलविण्यात आले. ४ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास नागपूर येथे उपचारादरम्यान तीचा मृत्यू झाला. नागपूर येथे शवविच्छेदन करण्यात आले.

प्रसुुतीपश्चात तरूणीचा मृत्यू झाल्याने आक्रोशीत नातेवाईकांनी सोमवार (४ डिसेंबर) रात्री ९ वाजताचे दरम्यान मृतदेह जिल्हा सामान्य रूग्णालयात आणले. दोषी डॉक्टरांवर तातडीने फौजदारी कारवाई करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली. जमावाचा आक्रोश सुरू असतांना पोलिसांची चमू घटनास्थळी दाखल झाली. ३० ते ४० नातेवाईकांचा जमाव मागण्या पूर्ण होईपर्यंत मृतदेह गावाकडे न्यायला तयार नव्हते.

अखेर पोलिस प्रशासन व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपचंद सोयाम यांच्या मध्यस्थीने तातडीने उच्चस्तरीय चौकशी समिती गठीत करण्याचे आश्वासन देण्यात आले. शवविच्छेदन व चौकशी समितीच्या अहवालातील दोष सिद्धतेनंतर तातडीने दोषींवर कारवाई करण्याचे स्पष्ट केल्याने नातेवाईकांचे समाधान झाले. मध्यरात्री १ वाजताचे दरम्यान मृतदेह जिल्हा सामान्य रूग्णालयातून हलविण्यात आले.

प्रसुती पश्चात बाळंतीण मृत्यू प्रकरणी चौकशीसाठी नातेवाईकांच्या मागणीनुसार नि:ष्पक्ष उच्चस्तरीय चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. शवविच्छेदन व चौकशी समितीच्या अहवालातील दोष सिद्धतेनुसार कायदेशिर कारवाई जाणार आहे.- डॉ. दीपचंद सोयाम, जिल्हा शल्य चिकित्सक, भंडारा.

Web Title: Relatives protest in case of death of baby after delivery; Type in District General Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.