महिलेच्या मृतदेहासह नातेवाईक धडकले तुमसर पोलीस ठाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 05:00 AM2020-09-13T05:00:00+5:302020-09-13T05:00:29+5:30
कोमल मुन्ना बोंद्रे (२५) रा. सुकळी (दे.) असे मृत महिलेचे नाव आहे. तिला प्रसूती कळा आल्याने ३० ऑगस्ट रोजी येथील सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता सिजेरियन प्रसूती केली. कोमलला मुलगी झाली. दरम्यान कोमलला त्रास जाणवू लागला. तिने डॉक्टरला ही बाब सांगितली. डॉक्टरांनी वेदनाक्षमक गोळी देवून वेळ मारून नेली.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : सिजेरियन प्रसूती झाल्यानंतर प्रकृती बिघडली असतानाही तिच्यावर योग्य उपचार न करता डॉक्टरांनी सुटी दिली. त्यामुळेच महिलेचा मृत्यू झाला, असा आरोप करीत तुमसर पोलीस ठाण्यावर महिलेचे नातेवाईक शनिवारी दुपारी धडकले. येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली.
कोमल मुन्ना बोंद्रे (२५) रा. सुकळी (दे.) असे मृत महिलेचे नाव आहे. तिला प्रसूती कळा आल्याने ३० ऑगस्ट रोजी येथील सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता सिजेरियन प्रसूती केली. कोमलला मुलगी झाली. दरम्यान कोमलला त्रास जाणवू लागला. तिने डॉक्टरला ही बाब सांगितली. डॉक्टरांनी वेदनाक्षमक गोळी देवून वेळ मारून नेली. मात्र तीन दिवसापासून लघुशंका होत नसल्याने तिचे पोट फुगले. अशा अवस्थेत ६ सप्टेंबर रोजी तिला रुग्णालयातून सुटी दिली होती. तिला घरी आणताच प्रकृती आणखी बिघडली. नातेवाईकांनी त्याच दिवशी रात्री ८ वाजता उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र डॉक्टर उपस्थित नसल्याने तिला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्यावेळी सिजेरियन कोणी केले, असे डॉक्टरांनी विचारले. त्यावेळी तुम्हीच तर सीजर केले, असे सांगितले. डॉक्टरांनी मी करणे शक्य नाही, असे म्हणून तिला भंडारा येथील खाजगी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. त्यावरून तिला भंडारा येथे दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने नागपूर येथील लता मंगेशकर वैद्यकीय महाविद्यालय आणि नंतर एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान सिजीरियन करताना चूक झाल्याने प्रकृती बिघडल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. ११ सप्टेंबर रोजी उपचार करण्यात आले. मात्र शनिवार १२ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता तिचा मृत्यू झाला.
संतापलेल्या नातेवाईकांनी नागपूरवरून मृतदेह थेट पोलीस ठाण्यात आणला. संबंधित डॉक्टरवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. पोलीस ठाण्यासमोर या प्रकाराने मोठी गर्दी झाली होती. यामुळे काही काळ पोलीस ठाण्याबाहेर तणाव निर्माण झाला. अखेर नातेवाईकांची समजूत काढण्यात आली.
चौकशीची मागणी
कोमल बोंद्रे हिच्या मृत्यूला उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर जबाबदार असून याप्रकरणी चौकशी समिती स्थापन करून सत्य बाहेर आणावे आणि संबंधितावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली. पोलिसांनी मध्यस्थी करून नातेवाईकांना शांत केले. मृतदेह घेवून नातेवाईक गावी गेले.
मृत महिला पोलीस ठाण्याच्या हद्दीबाहेरची आहे. तसेच घटनास्थळही बाहेरचे आहे. याबाबत नागपूर येथील डॉक्टरांशी संपर्क केला असता तिचा मृत्यू धक्क्याने झाल्याचे सांगितले. डॉक्टरवर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
-रामेश्वर पिपरेवार, ठाणेदार, तुमसर पोलीस ठाणे.