धान रोवणीसाठी बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:40 AM2021-07-14T04:40:23+5:302021-07-14T04:40:23+5:30

जांब (लोहारा) : गतवर्षी झालेल्या मुबलक पावसाने आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्प तुडुंब भरला असून सद्य:स्थितीत या प्रकल्पात ७५ टक्के ...

Release water from Bawanthadi project for paddy planting | धान रोवणीसाठी बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोडा

धान रोवणीसाठी बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोडा

Next

जांब (लोहारा) : गतवर्षी झालेल्या मुबलक पावसाने आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्प तुडुंब भरला असून सद्य:स्थितीत या प्रकल्पात ७५ टक्के जलसाठा आहे. आतापर्यंत या प्रकल्पातून ५० दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. याचा फायदा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशसाठी शेतकऱ्यांना सिंचनासाठी होत आहे. महाराष्ट्र-मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेला आंतरराज्यीय प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा आहे. यंदा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुबलक पाऊस झाला. त्यामुळे हा प्रकल्प तब्बल आठ वर्षांनंतर ७५ टक्के भरला आहे.

यापूर्वी या प्रकल्पातून उन्हाळी धान पिकांसाठी तीन टप्प्यांत पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. आगामी खरीप पिकांसाठीही या प्रकल्पातून शेतकऱ्यांना पाणी मिळणार असल्याची माहिती असली तरी शेतकरी वर्ग खरीप हंगामातील धान नर्सरी उन्हाच्या दाहकतेने कोमेजून जात आहेत. सुरुवातीच्या काळात पावसाने दमदार सुरुवात केली असली तरी, आता मात्र गेल्या आठ दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे व चिंतातुर झाला आहे.

शेतकऱ्याच्या धान नर्सरी व धान पीक रोवणीकरिता बावनथडी प्रकल्पाचे पाणी त्वरित सोडण्यात यावे या मागणीचे निवेदन तहसीलदारामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे.

मोहाडी तालुक्यातील, डोंगरगाव, कुशारी, काटेबाम्हणी, धोप, टाकला, उसर्रा, सालई (बु.) ताडगाव, सालई (खु.) सिहरी, मोरगाव, महालगाव, नेरला, बपेरा, पालडोंगरी, टांगा, पिंपपळगाव, अकोला टोला, आंधळगाव, मलिदा आदी परिसरात पावसाने गेल्या कित्येक दिवसांपासून हुलकावणी दिली आहे. त्यामुळे प्रखर उन्हाने पेरणी केलेल्या धान नर्सरी कोमेजून गेल्या आहेत. त्यातच बहुतेक शेतकऱ्यांच्या धान नर्सरी रोवणीयोग्य आल्या असल्याने धान पीक लागवडीकरिता बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोडण्याची गरज आहे.

त्यातच पावसाअभावी धान नर्सरी मणासन्न अवस्थेत सापडले आहे व धान रोवणी खोळंबली आहे. त्यामुळे शेतात पेरणी केलेल्या धान नर्सरी वाचविण्यासाठी व धान रोवणीकरिता आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्पाचे पाणी खरीप हंगामात धान पिकाला सोडण्याची मागणी केली आहे. अन्यथा डोंगरगाव व मोहाडी येथील चौकात शेतकऱ्यां‍सोबत आंदोलन करण्याचा इशारा भंडारा जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष देवा ईलमे यांनी निवेदनातून दिला आहे.

Web Title: Release water from Bawanthadi project for paddy planting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.