भंडारा-गोंदियातील पीएम आवास लाभार्थ्यांना दिलासा; उर्वरित निधी मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2022 12:46 PM2022-10-21T12:46:44+5:302022-10-21T12:47:25+5:30
परिणय फुके यांची मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा
भंडारा : पंतप्रधान आवास याेजनेच्या उर्वरित निधीपासून गोंदिया व भंडारा जिल्ह्याच्या नगर परिषद व नगर पंचायतीअंतर्गत हजारो लाभार्थी वंचित आहेत. ही बाब हेरून भंडारा-गाेंदियाचे विधान परिषद सदस्य डाॅ. परिणय फुके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. त्यात सकारात्मक चर्चा झाली असून उर्वरित निधी मिळण्याचा मार्ग माेकळा झाला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांसाठी ही दिवाळी भेट ठरणार आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळापासून पंतप्रधान आवास याेजनेचा निधी प्रलंबित आहे. प्रत्येक माणसाला आपले घर बनविण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारने त्यात बाधा आणली. निधी अडवून ठेवला. परिणामी लोक हक्काच्या घरांपासून वंचित राहिले. केंद्र सरकारची घरकूल योजना यशस्वी होऊ नये, यासाठी ज्यांनी कुणी प्रयत्न केले, ते जनतेच्या लक्षात आले आहे.
आता येत्या २४ तासांच्या आत पंतप्रधान आवास योजनेचा उर्वरित निधी संबंधितांना मिळणार आहे, असे भंडारा - गोंदिया जिल्ह्याचे विधान परिषद सदस्य आमदार डॉ. परिणय फुके यांनी सांगितले. त्यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. या लाभार्थ्यांची दिवाळी आनंदात जावी, यासाठी गृहनिर्माण योजनेची रखडलेली रक्कम देऊन त्यांना न्याय दिला पाहिजे, असे आमदार डॉ. फुके यांनी या भेटीत सांगितले. त्यानुसार आता लाभार्थ्यांना उर्वरित निधी वाटप केला जाणार आहे.