लोकसहभागातून काढला जातोय तलावातील गाळ
By Admin | Published: May 15, 2017 12:27 AM2017-05-15T00:27:01+5:302017-05-15T00:27:01+5:30
दरवर्षी साठत चाललेल्या गाळामुळे धरणांच्या व तलावांच्या साठवणूक क्षमतेत मोठया प्रमाणात घट होत आहे.
योजनांचा लाभ मिळणार : ‘चुलरडोह’ नागपूर विभागातील प्रथम गाव
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : दरवर्षी साठत चाललेल्या गाळामुळे धरणांच्या व तलावांच्या साठवणूक क्षमतेत मोठया प्रमाणात घट होत आहे. ही बाब विचारात घेवू शासनाने ‘गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार’ ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसहभागातून तलावातील गाळ काढण्याचा उपक्रम राबविणारे तुमसर तालुक्यातील चुलरडोह हे गाव नागपूर विभागातील प्रथम ठरले आहे.
बुद्ध पोर्णिमेच्या पर्वावर जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या हस्ते सदर कामाचा शुभारंभ करण्यात आला. साचलेला गाळ उपसा करुन शेतात पसरविल्यास धरणांची मुळ साठवणूक क्षमता पुर्न:स्थापित होण्याबराबरच कृषी उत्पन्नात भरीव वाढ होणार आहे. या निर्णयाला प्रतिसाद देत तुमसर तालुक्यातील चुलरडोह या गावाने लघुपाटबंधारे जिल्हा परिषदच्या माजी मालगुजारी तलावातील गाळ लोकसहभागातून काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, जिल्हा परिषद सदस्य तुरकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता पी. एस. पराते, तहसिलदार गजेंन्द्र बालपांडे, उपसरपंच रामटेके व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. चुल्हारडोह हे गाव दुष्काळग्रस्त असून जलयुक्त शिवार योजना २०१७-१८ मध्ये या गावाचा समावेश करण्यात आला आहे. या दुष्काळग्रस्त गावातील लोकांनी लोकसहभागातून धरणातील गाळ काढण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबाबत कौतूक केले.