पेरणीची कामे खोळंबली
By Admin | Published: July 4, 2015 01:19 AM2015-07-04T01:19:24+5:302015-07-04T01:19:24+5:30
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी आजपर्यत सरासरी ६८.३ टक्के पाऊस अधिक पडला असलातरी भंडारा जिल्ह्यातील १़ लाख ८४ हजार ७७४ हेक्टर क्षेत्रातील पेरणी खोळंबली आहे.
भंडारा : मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी आजपर्यत सरासरी ६८.३ टक्के पाऊस अधिक पडला असलातरी भंडारा जिल्ह्यातील १़ लाख ८४ हजार ७७४ हेक्टर क्षेत्रातील पेरणी खोळंबली आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे ही वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. खरीप हंगामासाठी सध्यस्थितीत १३ हजार ८६४ हेक्टर क्षेत्रात पिकाची पेरणी धोक्यात आली आहे़ जिल्ह्यात एक लाख ९८ हजार ६३९ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड होत असून, आतापर्यंत केवळ ७ टक्के हेक्टर क्षेत्रात प्रत्यक्ष पेरणी करण्यात आलेली आहे.
जिल्ह्यात १७ हजार ३४६ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी १० हजार ६६५ हेक्टर क्षेत्रात भात नर्सरीची लागवड करण्यात आली असून त्याची टक्केवारी ६१ एवढी आहे. यामध्ये भंडारा तालुक्यात १,५८२ हेक्टर, पवनी २,०४८ हेक्टर, मोहाडी २,२७९ हेक्टर, तुमसर ५७४, साकोली १,१२५, लाखांदूर १,६९० तर लाखनी तालुक्यात १,३६७ हेक्टर क्षेत्रात भात नर्सरीची लागवड करण्यात आली.
दमदार पावसामुळे शेतकऱ्यांनी १० हजार २११ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी ५ हजार ८६२ हेक्टर क्षेत्रात आवत्याची लागवड करण्यात आलेली आहे. त्याची टक्केवारी ५७ एवढी आहे. यामध्ये सर्वाधिक लागवड लाखनी तालुक्यात असून २,४०८ हेक्टर आहे. भंडारा ९ हेक्टर, पवनी १,९५४, मोहाडी २५, तुमसर निरंक, साकोली १८५ तर लाखांदूर तालुक्यात १,२८१ हेक्टर क्षेत्रात आवत्याची लागवड करण्यात आली. यासह जिल्ह्यात तुर ४,३४७, मुंग ३, तीळ १५, सोयाबिन १,३७६, ऊस १,६०७, हळद ३१२, कापूस ७३.५०, तर भाजिपाल्याची १,७९७ हेक्टरमध्ये लागवड करण्यात आली़ (नगर प्रतिनिधी)