निवडश्रेणीची प्रकरणे निकाली काढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 09:22 PM2019-02-08T21:22:55+5:302019-02-08T21:23:16+5:30
शिक्षणमंत्र्यांना निवेदन : भाजपा शिक्षक आघाडीचा पुढाकार
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्यातील स्थानिक स्वराज संस्थेच्या तसेच खाजगी अनुदानीत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील तसेच अध्यापक विद्यालयातील पुर्णकालीन शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी मिळालेली नाही. सदर निवडश्रेणी तात्काळ लागू करण्यात यावी, अशी मागणी भाजप शिक्षक आघाडीतर्फे करण्यात आली आहे. या आशयाचे निवेदन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत पाठविण्यात आले आहे.
२१ डिसेंबर २०१८ च्या शासन निर्णयाप्रमाणे प्राथमिक शिक्षकांसाठी भाषा-मुलभूत वाचन क्षमता कार्यक्रम, गणित संबोध विकसन, तेजस प्रशिक्षण, राज्यस्तरीय तंज्ञांसाठी वरिष्ठ श्रेणी, निवड श्रेणीसाठी लागू करण्यात आला आहे.प्रशिक्षणात जिल्हास्तरावर अनेक शिक्षकांनी तज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य केले असल्यावरही वरिष्ठ व निवड श्रेणीचा लाभ मिळालेला नाही. तसेच ‘चेस’, आयटीआयचे गणित व न्यासचे विज्ञान प्रशिक्षण आदी राज्यस्तरीय तज्ञ मार्गदर्शकांसाठी वरिष्ठ व निवड श्रेणी साठी लागु करण्यात आले आहे. प्रशिक्षणात अनेक शिक्षकांनी जिल्हा पातळीवर तज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्यही केले आहे. अशा जिल्हास्तरीय तंज्ञांना सुध्दा वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी सदर प्रशिक्षण ग्राह्य धरावे, अशी मागणी आहे. याशिवाय शासन निर्णयात अविरत दहा दिवसांचे प्रशिक्षण पातळी एक फक्त वरिष्ठ श्रेणीसाठी लागू करण्यात आले आहे. पंरतु निवड श्रेणीकरिता सन २०१८ - १९ पासून प्रत्येक वर्षी दहा दिवसप्रमाणे चार वर्षात चाळीस दिवसाचे प्रशिक्षण पुर्ण केले असल्यास ते ग्राह्य धरण्यात येईल असे निर्देशित आहे. ज्या शिक्षकांची सेवा २४ वर्ष झाली असताना त्यांना अजून ४ वर्ष निवडश्रेणीसाठी प्रशिक्षण करावे लागणार आहे. अशा शिक्षकांकडून प्रशिक्षणासंबंधी हमीपत्र घेऊन निवड श्रेणीसाठी पात्र धरावे अशी मागणी आहे. निवेदन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मार्फत अधीक्षक मेश्राम यांनी स्विकारले. यावेळी विदर्भ संयोजक डॉ. उल्हास फडके, जिल्हा संयोजक कैलास कुरंजेकर, ज्ञानेश्वर बोडखे, माजी उपशिक्षणाधिकारी गोवर्धन भोंगाडे , मुख्याध्यापक देवचंद चौधरी आदी उपस्थित होते.