निराधार योजनेचे मानधन रखडले; गरजू लाभार्थी मानधनाच्या प्रतीक्षेत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 01:40 PM2024-10-15T13:40:23+5:302024-10-15T13:41:52+5:30
लाभार्थ्यांची फरफट : आर्थिक विवंचनेचा करतायेत सामना
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : विधवा, दिव्यांग, परितक्त्या, निराधार, घटस्फोटित, वयोवृद्ध घटकांना शासनातर्फे जीवनज्ञापन करण्यासाठी मासिक मानधन दिले जाते. परंतु, गत काही महिन्यांपासून जिल्ह्यात गरजू लाभार्थी मानधनाच्या प्रतीक्षेत आर्थिक विवंचनेचा सामना करीत आहेत. या महिन्यात सणासुदीचे दिवस असताना त्यांना मात्र दोनवेळच्या जेवणासाठी हाल सोसावे लागत आहेत.
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन व राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य, वयोवृद्ध कलाकार मानधन आदी योजना समाजातील वंचित घटकांसाठी राबविण्यात येतात.
या गरजू व्यक्तींना नियमित मानधन मिळावे, असे अपेक्षित आहे. परंतु, ते बहुधा एकत्रच मिळते. गत काही महिन्यांपासून या लाभार्थ्यांचे मानधन अद्याप मिळाले नाही. शासनाने अनुदान जमा न केल्याने ही स्थिती उद्भवली असून, यामुळे मानधनावर अवलंबून असणाऱ्या गरजूंची आर्थिक ओढाताण सुरू आहे. श्रावणबाळ योजनेचे अधिकाधिक लाभार्थी वृद्ध आहेत. ६५ वर्षांवरील या वृद्धांना या वयात औषधपाण्याची गरज असते. पेन्शन न मिळाल्याने त्यांचा दवाखाना थांबला आहे. याशिवाय दैनंदिन खर्चाचीही अडचण झाली आहे. पेन्शन कधी येणार, याची विचारणा करण्यासाठी लाभार्थी तहसील कार्यालयात येरझाऱ्या घालत आहेत.
अनुदानच न आल्याने कर्मचाऱ्यांनाही उत्तर देणे कठीण झाले आहे. हाती पैसाच नसल्याने सण साजरे करणे दूर सध्या त्यांना रोज पोट भरण्याची भ्रांत पडली आहे. विशेष सहाय्य योजनेंतर्गत मानधन सुरू ठेवण्यासाठी योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी शासनाने हयातीच्या दाखल्याबरोबरच उत्पन्नाचा दाखला सादर करावा लागतो. अपंग, वृद्ध, निराधार लाभार्थ्यांनी मोठा मनस्ताप सहन करून या अटींची पूर्ती केली. गरीब, निराधार, वृद्ध, विधवा व परितक्त्या, गरीब लाभार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. परंतु, तरीही त्यांना नियमित मानधन देण्यात आडकाठी? असा प्रश्न लाभार्थ्यांनी केला आहे.
बँक, तहसीलच्या वाढल्या चकरा
याबाबत तहसील कार्यालयातील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी, अनुदान आले नसल्याने ३ महिन्यांचे पेन्शन प्रलंबित असल्याला दुजोरा दिला. हे लाभार्थी चौकशीसाठी बँकेत व तहसील कार्यालयाच्या पायऱ्या झिजवित आहेत.
काँग्रेसने वेधले प्रशासनाचे लक्ष
भंडारा तालुका महिला काँग्रेस कमिटीची अध्यक्षा स्वाती हेडाऊ यांच्या नेतृत्वात निराधार व वृद्ध कलाकार योजनेच्या थकीत मानधनाकरिता मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन उपजिल्हाधिकारी लोंढे यांना सोपविण्यात आले. यावेळी इंटक शहराध्यक्ष स्नेहा भोवते, महिला काँग्रेस तालुका उपाध्यक्ष स्नेहा रामटेके, नम्रता बागडे, सुभद्रा हेडाऊ, इंद्रमाती कोल्हे, सारू मेश्राम, तारा डुंभरे, वृंदा बागडे, श्यामदास हेडाऊ, बुधा मेश्राम आदी लाभार्थी उपस्थित होते.