ठाणा येथील 'आरओ' संच नादुरुस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 10:26 PM2018-02-28T22:26:51+5:302018-02-28T22:26:51+5:30
सहा महिन्यांपूर्वी सुरु झालेले ठाणा पेट्रोलपंप येथील शुद्ध पाण्याचा 'आरो' एक आठवड्यापासून नादुरुस्त अवस्थेत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
आॅनलाईन लोकमत
जवाहरनगर : सहा महिन्यांपूर्वी सुरु झालेले ठाणा पेट्रोलपंप येथील शुद्ध पाण्याचा 'आरो' एक आठवड्यापासून नादुरुस्त अवस्थेत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी शुद्ध पाण्यासाठी महिलांची भटकंती होत आहे. याकडे संबंधित वरिष्ठ विभागाने लक्ष देण्याची नितांत गरज आहे.
शुद्ध पाणी जनतेला मिळावे या हेतूने जिल्हा टंचाई कृती आराखड्यानुसार जिल्हा परिषद भंडारा द्वारे प्रत्येक ग्रामपंचायतीला लोकसंख्येनुसार नागनदीचे दूषित पाणीपुरवठा होत असलेल्या गावांना 'आरो'ची मंजुरी देण्यात आली. त्यानुसार ग्रामपंचायत ठाणा पेट्रोलपंप येथे चार व चार लक्ष असे आठ लक्ष किमतीचे दोन आरो प्लाँट उभारण्याच्या मंजुरीनुसार बांधकाम करण्यात आले. यात जुना ठाणा डॉ.आंबेडकर वॉर्ड क्रमांक ४ येथील हनुमान मंदिर समोर तर, दुसरा आरो महात्मा फुले वॉर्ड क्रमांक ५ मधील कॅनरा बँकलगत एप्रिल २०१७ मधील उभारण्यात आलेले आरो माहे आॅगस्ट २०१७ रोजी सुरु झाले. आठवड्याभरापासून महात्मा फुले वॉर्ड येथील 'आरो' संचात मोठ्या प्रमाणात बिघाड झालेला आहे. आरो चालकांच्या म्हणण्यानुसार सदर कंपनीला याबाबत माहिती देण्यात आली आहे. आरोची दुरुस्ती झालेली नाही. मागील ग्रामपंचायत कमेटीने खासगी कंत्राटदारास एक वर्षाकरिता आरो चालविण्यास देण्यात आले असल्याची माहिती ग्रामपंचायत सुत्रांनी दिली.