डॉक्टरवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा
By admin | Published: July 5, 2017 12:56 AM2017-07-05T00:56:57+5:302017-07-05T00:56:57+5:30
नऊ महिन्यांची गर्भवती असलेल्या ज्योती विनोद गायकवाड (३०) रा.नेरला या महिलेला अड्याळ ग्रामीण रुग्णालयातून भंडारा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले.
पतीची तक्रार : प्रकरण नेरला येथील गर्भवती महिलेच्या मृत्यूचे
लोकमत न्यूज नेटवर्क
चिचाळ : नऊ महिन्यांची गर्भवती असलेल्या ज्योती विनोद गायकवाड (३०) रा.नेरला या महिलेला अड्याळ ग्रामीण रुग्णालयातून भंडारा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र सात तास लोटूनही उपचार करण्यात न आल्याने तिचा मृत्यू झाला असा आरोप महिलेच्या पतीने केला आहे. हलगर्जी करणाऱ्या संबधित डॉक्टरवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून कारवाईची मागणी विनोद गायकवाड यांनी वरिष्ठांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
ही घटना ५ जून रोजी घडली होती. पवनी तालुक्यातील नेरला येथील ज्योती गायकवाड या नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेला ४ जून रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास अड्याळच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर तिला दि. ५ जून ला रात्री २ वाजताच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र यादरम्यान ज्योतीवर डॉक्टरांकडून उपचार झाले नाही, असा आरोप आहे. ५ जून रोजी सकाळी ७.३० वाजता तपासणीकरिता डॉक्टर आले. त्यावेळी ज्योतीची प्रकृती अधिकच खालावल्याने तिला नागपूरच्या शासकीय रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. आले. भंडाऱ्यावरून नागपूरला नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला.५ जून ला रात्रीच्या सुमारास ज्योतीला वेळेवर उपचार मिळाला असता तर कदाचित तिचा मृत्यू झाला नसता. गर्भवती महिलेच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या डॉक्टरवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून कारवाई करण्याची मागणी आहे.