चौकशी समितीचा अहवाल येण्यास होणार विलंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:32 AM2021-01-13T05:32:42+5:302021-01-13T05:32:42+5:30
ज्ञानेश्वर मुंदे भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्निकांड प्रकरणाच्या चौकशी समितीचा अहवाल येण्यास आणखी दोन दिवस लागण्याची शक्यता ...
ज्ञानेश्वर मुंदे
भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्निकांड प्रकरणाच्या चौकशी समितीचा अहवाल येण्यास आणखी दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. आरोग्य मंत्र्यांनी तीन दिवसात अहवाल देण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी समितीच्या अध्यक्षांची उचलबांगडी केली. नवीन अध्यक्षांची नियुक्ती केली. मंगळवारी हा अहवाल अपेक्षित होता. मात्र आणखी काही दिवस अहवाल येण्यास लागतील आणि त्यानंतरच कारवाईची दिशा निश्चित होणार आहे.
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी पहाटे अग्नितांडव होऊन दहा निष्पाप चिमुकल्यांचा बळी गेला होता. या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह डझनभर मंत्री भंडाऱ्यात दाखल झाले. शनिवारी तातडीने आरोग्यमंत्री राजेश टोपे रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी अग्निकांडाच्या चौकशीसाठी आरोग्य संचालक साधना तायडे यांची नियुक्ती केली होती. सहा सदस्यीय समिती तीन दिवसात अहवाल सादर करेल, असे स्पष्ट केले होते. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. त्यांनी या समितीच्या अध्यक्षांची उचलबांगडी करून त्या ठिकाणी नागपूरचे विभागीय आयुक्त डाॅ. संजयकुमार यांची नियुक्ती केली. तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.
दरम्यान, या समितीचा अहवाल मंगळवारपर्यंत येणे अपेक्षित होते. परंतु आणखी दोन ते तीन दिवस अहवाल येण्यास लागतील, अशी माहिती आहे. या अहवालावरच या घटनेत कोण दोषी आहे हे ठरणार आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा चौकशी समितीच्या अहवालाकडे लागल्या आहेत. चौकशी समितीने आपले काम सुरू केले असून रुग्णालयाच्या पाहणीसोबत बयाण नोंदविणे सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता चौकशी समितीच्या अहवालानंतर जी तक्रार प्राप्त होईल त्यानुसार कारवाई केली जाईल, असे सांगितले. एकंदरीत, या चौकशी अहवालावर या घटनेला जबाबदार कोण आहे, याची निश्चिती होणार असल्याने सर्वांना अहवालाची उत्सुकता आहे.
बाॅक्स
भंडारा ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्निकांड प्रकरणात भंडारा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. सहायक जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. सुनीता बढे यांच्या वतीने परिसेविका ज्योती शेखर भारसाकरे यांनी तक्रार दाखल केली. त्या तक्रारीवरून शनिवारी सायंकाळी ७.४६ वाजता आकस्मिक मृत्यूचा गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक केदार करीत असल्याचे पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे पाठविण्यात येणाऱ्या दैनंदिन प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.