रेती माफियांच्या विरोधात ठाणेदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 10:04 PM2019-05-30T22:04:40+5:302019-05-30T22:05:09+5:30
गावात एक नव्हे बारा रेतीचे अनधिकृत डम्पिंग यार्ड आहेत. यामुळे गावकऱ्यांची झोपच उडाली असल्याने गुरुवारला ३० मे रोजी दुपारी १२ वाजता गावकरी रेती माफीयांचे विरोधात सिहोरा पोलीस ठाण्यात धडकले. त्यांनी रेतीची चोरी बंद करण्याची मागणी लावून धरली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : गावात एक नव्हे बारा रेतीचे अनधिकृत डम्पिंग यार्ड आहेत. यामुळे गावकऱ्यांची झोपच उडाली असल्याने गुरुवारला ३० मे रोजी दुपारी १२ वाजता गावकरी रेती माफीयांचे विरोधात सिहोरा पोलीस ठाण्यात धडकले. त्यांनी रेतीची चोरी बंद करण्याची मागणी लावून धरली.
सिहोरा परिसरात वैनगंगा, बावनथडी नद्यांचे काठालगत गावात जागोजागी रेतीच डम्पिंग यार्ड आहेत. रेतीचे घाट लिलाव नसतांना नियम धाब्यावर बसवित राजरोसपणे रेतीची चोरी सुरु आहे. नदीचे पात्रात थेट जेसीबी मशीनने रेतीचा उपसा करण्यात येत आहे. नद्यांचे काठावरील गावात तर डम्पिंग यार्डाचे भव्य चित्र निदर्शनास येत आहे. पांजरा गावाचे शेजारी असणाºया वैनगंगा नदीचे पात्रातून रेतीची उपसा करण्यात येत आहे. या रेतीची साठवणूक कर्कापूर गावाचे शिवारात करण्यात येत आहे. या गावात एक नव्हे तब्बल १० ते १२ अनधिकृत डम्पिंग यार्ड आहे. दिवस रात्र रेतीचा उपसा करण्यात येत असल्याने गावकरी घराबाहेर पडतांना भिती बाळगत आहे.
ट्रॅक्टर आणि ट्रकचा गावात महापूर आल्याचे चित्र निर्माण होत आहे. या वाहनाचे आवाजाने गावकऱ्यांची झोपच उडाली असून अनेक आजारांना बळी पडण्याची वेळ आली आहे. रेतीमाफीयाचे सोबत रोजची भांडणे गावात सुरु झाली आहे. गावकºयांना माफिया धमक्या देत असल्याने वास्तविक चित्र गावात आहेत. राजकीय पुढारी आणि कार्यकर्ते या माफीयांचे भुमिकेत असल्याने गावकऱ्यांचे ऐकुण घेत नाही.
यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी गुरुवारला दुपारी १२ वाजता सरंपच प्रल्हाद आगासे यांचे नेतृत्वात सिहोरा पोलीस ठाणे गाठले. प्रभारी ठाणेदार राजु गायकवाड यांचे सोबत गावकऱ्यांचे शिष्टमंडळाने तब्बल दोन तास चर्चा केली. रेती माफीयांना पोलिसांचे अभय असल्याचा आरोप शिष्टमंडळाने केले. अनधिकृत डम्पिंग यार्ड तथा रेतीची चोरी थांबविण्याची मागणी गावकऱ्यांचे शिष्टमंडळाने लावून धरली. परंतु चर्चा निष्कर्ष पर्यंत पोहचली नाही. वरिष्ठांचे आदेशानंतर रेती चोरी विरोधात कारवाई केली जाणार असल्याचे सांगताच गावकºयांनी धारेवर घेतले. नद्याचे काठावरील गावात तथा मुख्य चौकात पोलीस चौकी मंजुरी करीता उपविभागीय अधिकारी तुमसर यांना ११ जानेवारी ला पोलिसांनी पत्र दिले आहे. परंतु या पत्राची दखल महसूल विभाग दखल घेत नाही. तथा वरिष्ठ अधिकारी साधा ब्र काढत नाही, गावकऱ्यांनी तुमसर बपेरा राज्य मार्गावरील हरदोली गावात रेती माफीया, पोलीस प्रशसन, महसूल विभाग यांचे विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. करणार असल्याचे सांगितले. या चर्चेत सरपंच प्रल्हाद आगासे, पोलीस पाटील मुकुंदा आगाशे, शैलेश मिश्रा, अंकीत मिश्रा, सोनु आगाशे, सुनील आगाशे, शरद आगाशे, अभय मिश्रा, प्रविण मिश्रा, शुभम आगाशे उपस्थित होते.
'तो' पालीस पाटील कोण?
पोलीस आणि गावकरी यांच्यात चर्चा सुरु असतांना रेतीचे ट्रक आणि ट्रॅक्टर धारकाकडून एक पोलीस पाटील वसुली करणारा एजंट असल्याचे गावकºयांनी सांगितले. परिसरात या पोलीस पाटील एजंट बाबाची चांगलीच चर्चा आहे. पोलीस पाटलांचा बेधडक व्यवसाय परिसरात सुरु आहे.
रेती चोरीच्या कारवाई संदर्भात वरिष्ठांच्या आदेशाचे पालन केले जाईल. त्यांचे निर्देश प्राप्त होताच धडक कारवाईची मोहीम राबविली जाईल.
-राजु गायकवाड, प्रभारी ठाणेदार, सिहोरा.
येत्या दोन दिवसाचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. रेती तस्कर व डम्पिंग धारकांचे विरोधात कारवाई करिता रास्ता रोको आंदोलन करणार आहे.
-प्रल्हाद आगाशे, सरपंच, कर्कापूर.