कत्तलीस जाणाऱ्या ८१ जनावरांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:24 AM2021-06-17T04:24:51+5:302021-06-17T04:24:51+5:30
भंडारा : जनावरांची कत्तलीसाठी रवानगी होत असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी टाकलेल्या धाडीत ८१ जनावरांची सुटका करण्यात आली. दोन वाहनांसह ...
भंडारा : जनावरांची कत्तलीसाठी रवानगी होत असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी टाकलेल्या धाडीत ८१ जनावरांची सुटका करण्यात आली. दोन वाहनांसह ३४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई मंगळवारी रात्री जवाहरनगर पोलिसांनी जवाहरनगर लगतच्या गणेश वाॅर्डात केली.
जवाहरनगरचे ठाणेदार पंकज बैसाने यांना गोपनीय माहिती मिळाली. जनावरे कत्तलीसाठी जाण्याच्या तयारीत असल्याचे कळले. त्यावरून त्यांनी पथक तयार करुन रवाना केले. जवाहरनगर - शहापूर मार्गावरील गणेश वाॅर्डातील बोडी जवळ जनावरे अपुऱ्या जागेत दाटीवाटीने आणि आखूड दोराने बांधलेली दिसून आली. त्याठिकाणी जनावरांना घेऊन जाण्यासाठी ट्रकही आले होते. यावेळी तब्बल ८१ जनावरांची सुटका पोलिसांनी केली.
याप्रकरणी आरोपी बालगोपाल ऋषी दुरुगकर रा. आंबेडकर वाॅर्ड शहापूर, शब्बीर साबीद शेख भाजीमंडी कामठी, समीर अहमद कुरैशी भाजीमंडी कामठी, अंकुश चिंतामण काळे रा. लावेश्वर ता. मोहाडी, विशाल विलास उताणे रा. लावेश्वर या पाच जणांना अटक करण्यात आली. त्यांच्या जवळून ट्रक क्रमांक एमपी २ बीएच १२५५ आणि बोलेरो पीकअप वाहन क्रमांक एमएच ३६ एफ ३८०३ जप्त करण्यात आले. यावेळी ३४ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात जवाहरनगरचे ठाणेदार पंकज बैसाने व पथकाने केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गिरीश राणे करीत आहेत. या जनावरांची रवानगी चांदोरी येथील गौशाळेत करण्यात आली आहे.
बाॅक्स
जनावर तस्करीविरुद्ध पोलिसांची मोहीम
जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात जनावरांची तस्करी होत आहे. या प्रकाराला आळा घालण्याचे आदेश पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी दिले. त्यानुसार जिल्ह्यातील विविध ठिकाणी सापळे रचून वाहनांची तपासणी केली जात आहे. शेकडो जनावरांची पोलिसांनी सुटका केली आहे.