पंचायत समिती सभापतिपदाचे आरक्षण जाहीर
By Admin | Published: July 6, 2015 12:32 AM2015-07-06T00:32:45+5:302015-07-06T00:32:45+5:30
जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या ७ सभापती पदाकरीता आज,रविवारी जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी सर्वांसमक्ष सोडत काढली.
तुमसर,पवनी, मोहाडी सर्वसाधारण प्रर्वगासाठी राखीव
साकोलीत अनुसूचित जाती, तर लाखनीत अनुसूचित जमातीसाठी राखीव
भंडारा : जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या ७ सभापती पदाकरीता आज,रविवारी जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी सर्वांसमक्ष सोडत काढली. यामध्ये साकोली अनुसूचित जातीसाठी तर लाखनी अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव करण्यात आले. तसेच नागरिकांचा मागास प्रवर्ग भंडारा आणि लाखांदूर महिला, सर्वसाधारण प्रवर्गात तुमसर, पवनी आणि मोहाडी हे क्षेत्र असून त्यापैकी तुमसर आणि पवनी हे महिलांसाठी राखीव आहेत.
महाराष्ट्र जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती तसेच पंचायत समिती सभापती अधिनियम १९६२ च्या कलम २ (इ) प्रमाणे पंचायत समिती पदासाठी आरक्षणाची सोडत काढण्यात आली. शासनाने १६ डिसेंबर २०१३ रोजी एका अधिसूचनेप्रमाणे सर्व जिल्ह्यांसाठी आरक्षण जाहिर केले होते. त्याप्रमाणे भंडारा जिल्ह्यात पंचायत समिती सभापती पदासाठी अनुसूचित जाती-१, अनुसूचित जमाती-१ (महिला), नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी दोन त्यापैकी १ महिला, तसेच सवर्साधारण प्रवर्गामध्ये तीन त्यापैकी २ महिला या प्रमाणे आरक्षण काढण्यात आले होते.
जिल्ह्यातील पंचायत सभापती पदाकरीता सद्यस्थितीत लागू असलेले आरक्षण १२ जूलै २०१५ रोजी समाप्त होत आहे. त्यामुळे लगेच येणाऱ्या दिवसापासून अडीच वर्षाच्या कालावधीकरीता आज जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी ७ सभापती पदासाठी आरक्षण जाहिर केले.
ज्या पंचायत समिती क्षेत्रात अनुसूचित जातीची लोकसंख्या सर्वात जास्त आहे, ते क्षेत्र अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात येते. त्याप्रमाणे भंडारा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार ९३२ एवढ्या अनुसूचित जातीच्या लोकसंख्येपैकी भंडारा २१.४१ टक्के, पवनी २१.१० टक्के, लाखांदूर १८.१७ टक्के, लाखनी १८.६० टक्के, साकोली १७.८४ टक्के, तुमसर १०.३५ टक्के, मोहाडी १०.३२ टक्के अशी लोकसंख्येचे प्रमाण आहे. मात्र यापूर्वी भंडारा, पवनी, लाखांदूर आणि लाखनी या क्षेत्रामध्ये आरक्षण देण्यात आले होते. त्यामुळे ते क्षेत्र वगळून उर्वरित साकोली, मोहाडी व तुमसर यापैकी जास्त लोकसंख्या असलेले साकोली क्षेत्र अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.
अनुसूचित जमातीसाठी सुध्दा जास्त लोकसंख्या असलेल्या क्षेत्राला आरक्षण देण्यात येते. भंडारा जिल्ह्यात एकूण ९ लाख ९३ हजार २०६ लोकसंख्येपैकी ७८ हजार ४८३ एवढी लोकसंख्या अनुसूचित जमातीची आहे. त्यापैकी तुमसर १३.२८ टक्के, साकोली ११.२२ टक्के, पवनी ७.३ टक्के, लाखनी ६.७१ टक्के, भंडारा ५.८३ टक्के, लाखांदूर ५.१८ टक्के, तर मोहाडी ४.८६ टक्के असे लोकसंख्येचे प्रमाण आहे.
यामध्ये पुर्वी तुमसर, साकोली, पवनी आणि मोहाडी या क्षेत्राला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळाले होते. त्यामुळे हे क्षेत्र वगळून उर्वरित लाखनी, भंडारा व लाखांदूर यापैकी सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या लाखनी क्षेत्राला अनुसूचित जमाती महिलासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षणाची सोडत किशिका गोखले या चिमुकलीच्या हाताने चिठ्ठी टाकून काढण्यात आली. यामध्ये भंडारा (सर्वसाधारण) तर लाखांदूर महिलासाठी सोडत काढण्यात निघाली. त्याच प्रमाणे सर्वसाधारण प्रर्वगासाठी तुमसर, पवनी, मोहाडी हे क्षेत्र असून त्यापैकी तुमसर व पवनी महिलांसाठी आहे. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महाजन, उपजिल्हाधिकारी (महसूल) सुजाता गंधे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळके, राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)