आरक्षण निघाले आता पळवापळवी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:37 AM2021-02-11T04:37:37+5:302021-02-11T04:37:37+5:30
सरपंचपदासाठी उमेदवारांची पळवापळवी व आमिष देण्याचे सत्र सुरू असल्याचे चित्र तालुक्यात पाहावयास मिळत आहे. साकोली तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक नुकतीच ...
सरपंचपदासाठी उमेदवारांची पळवापळवी व आमिष देण्याचे सत्र सुरू असल्याचे चित्र तालुक्यात पाहावयास मिळत आहे. साकोली तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक नुकतीच शांततेत पार पडली. प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे कुठेच अनुचित प्रकार घडला नाही. नुकतीच आरक्षण सोडत पार पडली. यानंतर अनेक गावकऱ्यांनी सत्तास्थापनेसाठी कंबर कसली आहे. आरक्षण सोडतीनंतर चित्र स्पष्ट झाले. तसेच सत्तास्थापनेसाठी सदस्यांनी आमिष देणे सुरू झाले. तालुक्यातील २२ सरपंचांची निवड आता आठवडाभरात होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी माेर्चेबांधणी सुरू आहे. काही तळ्यात काही मळ्यात असे चित्र ग्रामीण भागात सुरू आहे. काही ठिकाणी अनेक सदस्यांना पर्यटनस्थळी व काहींना देवदर्शनासाठी पाठवून सुरक्षित ठेवण्यात आले आहे. तर, नवख्या सदस्यांना विविध पंचपक्वान्नांची मेजवानी सुरू आहे.
बॉक्स
सत्तेच्या रिमोटसाठी प्रयत्न
अनेक ठिकाणी पॅनलप्रमुखांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, तरीही सत्तेचा रिमोट आपल्याच हाती असावा, यासाठी पॅनलप्रमुख व गावपुढाऱ्यांनी सरपंचपदाचा सदस्य आणतोच, अशी हमी मिरविणे सुरू केले आहे. निवडून आलेल्या अनेक सदस्यांना गावपुढारीही व राजकीय नेतेमंडळीतर्फे काही प्रलोभने दिली जात आहे.
बॉक्स
सरपंचाची या तारखेला निवड
१२ फेब्रुवारीला उसगाव, चांदोरी, पळसपाणी, घानोड, आमगाव बुजरूक, उमरझरी, खैरी वलमाझरी, बोरगाव, परसटोला, खांबा. १५ फेब्रुवारीला मोखे, विर्शी, उकारा, चारगाव, ब्राह्मणी, धर्मापुरी, शिवनीबांध, साखरा, कटंगधरा व बोळदे या ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच यांची निवड होणार आहे. यासाठी अध्यासी अधिकारी म्हणून तालुका कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी, मंडळ अधिकारी, अव्वल कारकून यांची नियुक्ती करण्यात आली आहे.