राखीव वनपरिक्षेत्रात वनरक्षकावर हल्ला
By Admin | Published: May 11, 2016 12:47 AM2016-05-11T00:47:26+5:302016-05-11T00:47:26+5:30
राखीव वनपरिक्षेत्रात पर्यटन व पार्टी करण्यावर बंदी असताना काही व्यक्तींनी मद्यप्राशन करून हौदोस घातला.
सहा दारुड्यांना अटक : ऐवजसह रोकड लांबविली
भंडारा : राखीव वनपरिक्षेत्रात पर्यटन व पार्टी करण्यावर बंदी असताना काही व्यक्तींनी मद्यप्राशन करून हौदोस घातला. ही बाब लक्षात येताच हटकणाऱ्या वनरक्षकाला मद्यधुंद व्यक्तींनी हल्ला करून जबर मारहाण केली. ऐवढ्यावर ते न थांबता त्यांच्याजवळील मोबाईल, सोन्याची चैन व रोख रक्कम लांबविली. ही घटना नागझिरा वन्यजीव अभयारण्यांतर्गत येणाऱ्या खुर्शीपार (कोका) जंगल शिवारात शुक्रवारला घडली.
संजय रामदास अंबुले (२७) असे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी लाखनी पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून अन्य दोन फरार आहेत. अटक केलेल्यांमध्ये विरेंद्र उर्फ कल्लू लिखिराम दमाहे (३१), संतोष विजय लिल्हारे (३१), सुखराम चैतराम मोहारे (४९), सचिन उकराम ठवकर (२८), राजकुमार हरी बिरनवारे (४२) सर्व रा. देव्हाडी, अमित वसंत भवसागर (२३) रा. गांधी वॉर्ड तुमसर यांचा समावेश आहे.
नागझिरा वन्यजीव अभयारण्य अंतर्गत येणाऱ्या साकोली उप वनपरिक्षेत्रातील खुर्शीपार (कोका) हे राखीव वन परिक्षेत्रात येत असल्याने येथे प्रवेश बंदी आहे. वनविभागाचा नियम धाब्यावर बसून आठ व्यक्तींनी बफर झोन मार्गाने एमएच २८ व्ही ३८९२ क्रमांकाची चारचाकी वाहनासह राखीव वनक्षेत्रात प्रवेश केला. यानंतर आठही जणांनी राखीव वनक्षेत्रातील रस्त्यालगत मद्यप्राशन करून अक्षरश: हौदोस घातला. राखीव वनपरिक्षेत्रात गाडी खाली उतरण्यावर बंदी आहे. सोबतच पर्यटनासाठी जाताना वनविभागाची परवानगी लागते मात्र हे नियम भंग करुन त्यांनी जंगलात प्रवेश केला होता.
यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी संजय अंबुले हे एका वन मजूरासह दुपारी कर्तव्यावर होते. राखीव वनपरिक्षेत्रात प्रवेश बंदी असतानाही मद्यप्राशन करणाऱ्यांना त्यांनी वनविभागाचे नियमभंग करणाऱ्या हटकले.
यावरून आठही जणांनी अंबुले यांना शिवीगाळ करून मारहाण केली. सोबतच त्यांच्याजवळील मोबाईल, सोन्याची चैन व रोख ५,५०० रूपये हिसकाविला. या मारहाणीत अंबुले जखमी झाले. वनमजूराच्या मदतीने त्यांनी कशीबशी सुटका करून अभयारण्याच्या वरिष्ठांना घटनेची माहिती दिली.
याप्रकरणी लाखनी पोलिसांनी संजय अंबुले यांच्या तक्रारीवरून कलम ३९७, ३५३, ३३२ भादंवि अन्वये गुन्हा नोंदविला व सहा जणांना अटक केली. यातील अन्य दोन जण फरार आहे. अटकेतील सहाही जणांना न्यायालयात हजर केले असता त्यांची बुधवारपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली. तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चाकाटे करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)