शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह सील
By admin | Published: March 29, 2016 12:26 AM2016-03-29T00:26:51+5:302016-03-29T00:26:51+5:30
७१ हजारांचे थकीत कर प्रकरणी तुमसर नगरपरिषदेने शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृह गृहपाल कार्यालय सील केले.
कर थकीत : नगरपरिषदेची कारवाई
तुमसर : ७१ हजारांचे थकीत कर प्रकरणी तुमसर नगरपरिषदेने शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृह गृहपाल कार्यालय सील केले. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली. ही कारवाई सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास करण्यात आली.
शहरातील बजाज नगरात अभिषेक अग्रवाल यांच्या इमारतीत शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह भाड्याने आहे. येथे ८० मुली राहतात. सन २०१४ ते २०१६ पर्यंत तुमसर नगरपरिषदेचे ७१ हजार ३१६ रुपये कर थकीत आहे. जानेवारी महिन्यात नगरपरिषदेने इमारत मालकास लिखीत अल्टीमेटम दिला होता. परंतु थकीत कर भरण्यात आले नाही. त्यामुळे नगरपरिषदेने सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास वसतिगृह गृहपालांचे कार्यालय सील करण्याची कारवाई केली. तत्पूर्वी गृहपालांनी इमारत मालकास थकीत कर भरण्यास कळविले होते. परंतु इमारत मालकाने मी कर भरणार नाही. शासकीय वसतिगृह असल्याने तुम्हीच कर भरा असा पवित्रा घेतला होता. यापूर्वी ही नगरपरिषदेने इमारत मालकाला थकीत कर भरण्यासंदर्भात नोटीस दिल्या होत्या. इमारतीचे भाडे प्रतिमहिना ६ ते ७ हजार इतके आहे. तर वार्षिक नगरपरिषदेचा कर ६८ हजार इतका आहे. यामुळे प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
सदर कारवाई मुख्याधिकारी चंद्रशेखर गुल्हाने, कर निरीक्षक वहीद खान, मुख्य लिपीक साखरकर, नाशिर अली, चौधरी, गणेश मेहर यांच्या पथकाने केली. (तालुका प्रतिनिधी)